बातम्या
राजारामपुरीत गणेशोत्सव आगमन मिरवणुकीसंदर्भात पोलीस प्रशासनाची बैठक
By nisha patil - 8/22/2025 11:58:44 AM
Share This News:
राजारामपुरीत गणेशोत्सव आगमन मिरवणुकीसंदर्भात पोलीस प्रशासनाची बैठक
कोल्हापूर:- राजारामपुरी पोलीस ठाणे हद्दीतील गणेशोत्सव आगमन मिरवणुकीच्या अनुषंगाने आज सकाळी 11 वाजता इंद्रप्रस्थ हॉल, लकी बाजार येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
या बैठकीस मा. पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता अध्यक्षस्थानी होते. त्यांच्यासोबत अपर पोलीस अधीक्षक धीरजकुमार बच्चू, शहर विभाग उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिया पाटील प्रमुख उपस्थित होते.
बैठकीत मा. पोलीस अधीक्षक यांनी स्पष्ट केले की, कोल्हापूर जिल्ह्यातील गणेशोत्सवाची सुरुवात राजारामपुरी आगमन मिरवणुकीपासून होते. त्यामुळे ही मिरवणूक पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात, शांततेत आणि उत्साहात पार पडावी, कोणताही गालबोट लागू नये, याबाबत आवाहन करण्यात आले.
पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी माहिती देताना सांगितले की, मिरवणुकीत वाद टाळण्यासाठी सर्व सहभागी गणेश मंडळांना लकी ड्रॉ पद्धतीने क्रमांक देण्यात आले आहेत. यावेळी राजारामपुरी परिसरातील 50 ते 60 गणेश मंडळांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार लेदर बंदी, तसेच ट्रॅक्टरच्या पुढील भागावर कोणी उभे राहून नाचणार नाही, याबाबत सूचना देण्यात आल्या. सर्व मंडळांची मिरवणूक रात्री 12 वाजेपर्यंत संपवणे बंधनकारक असेल. सकाळच्या सत्रात मिरवणूक काढता येईल; परंतु दुपारी 2 नंतर मुख्य मार्गावर कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही.
राजारामपुरी आगमन मिरवणूक संध्याकाळी 5 वाजता सुरू होणार असल्याचेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
राजारामपुरीत गणेशोत्सव आगमन मिरवणुकीसंदर्भात पोलीस प्रशासनाची बैठक
|