बातम्या
बिबट्याच्या हल्ल्यातही पोलिसांचा जीवावरचा संघर्ष; SP गुप्तांची दाद
By nisha patil - 11/14/2025 4:19:56 PM
Share This News:
बिबट्याच्या हल्ल्यातही पोलिसांचा जीवावरचा संघर्ष; SP गुप्तांची दाद
नागाळा पार्क परिसरात अचानक बिबट्या दिसताच शहरात घबराट उडाली. काही क्षणांतच पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी जमा होऊ लागली. अशा गंभीर परिस्थितीत शाहूपुरीचे पोलिस निरीक्षक संतोष डोके, अंमलदार कृष्णा पाटील आणि पथकातील पाच धाडसी पोलिसांनी स्थलावर धाव घेत परिस्थिती हाताळण्यास सुरुवात केली.
परिसरात वाढणारी गर्दी पाहून त्यांनी नागरिकांना सुरक्षितस्थळी हलण्याच्या सूचना दिल्या आणि परिसर रिकामा करण्याचा प्रयत्न सुरू केला. याच दरम्यान इमारतीमागून आलेल्या बिबट्याने अंमलदार कृष्णा पाटील यांच्यावर झडप घातली. पाटील यांनी धैर्य दाखवत हा हल्ला परतवून लावला. त्यानंतर बिबट्याने माळी तुकाराम खोंदल यांच्यावर हल्ला करून त्यांना जखमी केले, त्यामुळे वातावरण आणखी तणावपूर्ण बनले.
सुमारे तीन तास चाललेल्या या थरारात निरीक्षक संतोष डोके यांनी पथकासह युद्धपातळीवर काम करत नागरिकांना हानी पोहोचू नये यासाठी सातत्याने प्रयत्न केले. सतर्कता, धाडस आणि तत्परतेच्या जोरावर अखेर परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश मिळाले.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी पथकाचे कौतुक करून त्यांच्या सन्मानाचा प्रस्ताव मागवला आहे. अपर पोलिस अधीक्षक डॉ. धीरजकुमार बच्चू आणि अप्पासाहेब जाधव यांनीही टीमचे अभिनंदन केले आहे.
बिबट्याच्या हल्ल्यातही पोलिसांचा जीवावरचा संघर्ष; SP गुप्तांची दाद
|