बातम्या
आचारसंहितेत पोलिसांची ‘पायी गस्त’ मोहीम; कायदा-सुव्यवस्थेसाठी कडक पावले
By nisha patil - 11/18/2025 4:25:15 PM
Share This News:
आचारसंहितेत पोलिसांची ‘पायी गस्त’ मोहीम; कायदा-सुव्यवस्थेसाठी कडक पावले
जिल्ह्यात नगरपालिका निवडणूकांची आचारसंहिता लागल्याने शहरातील कायदा-सुव्यवस्था अधिक कडकपणे सांभाळण्यासाठी पोलिसांनी सोमवारपासून पायी गस्त मोहीम सुरू केली आहे. शहरातील चारही पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी संवेदनशील भागात उतरले असून, पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांच्या सूचनेनुसार ही कारवाई राबवण्यात येत आहे.
शहरात चेन स्नॅचिंग, दुचाकी चोरी आणि घरफोड्या वाढल्याच्या पार्श्वभूमीवर गुन्हे रोखण्यासाठी विशेष सतर्कता बाळगण्याच्या सूचना अधीक्षकांनी सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यानुसार शाहूपुरी, लक्ष्मीपुरी, जुना राजवाडा आणि राजारामपुरी पोलीस स्टेशनच्या पथकांनी सोमवारी सायंकाळपासून शहरातील विविध ठिकाणी पायी गस्त घालण्यास सुरुवात केली. प्रभारी अधिकाऱ्यांनी स्वतः मैदानात उतरून गस्तीत सहभाग घेतला.
निवडणुकीचे वातावरण तापत असताना कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई, कोम्बिंग ऑपरेशन, संशयितांचा शोध, नाकाबंदी आदी उपाययोजना सक्रिय केल्या जाणार असल्याची माहिती प्रभारी अधिकाऱ्यांनी दिली.
पायी गस्त उपक्रम प्रभावी ठरण्यासाठी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सातत्याने हा उपक्रम प्रामाणिकपणे राबवणे आवश्यक असल्याचे जाणकारांनी मत व्यक्त केले. काही काळापूर्वी पोलिसांची सायकल गस्त सुरू झाली होती; मात्र काही दिवसांतच त्या सायकली स्टेशनच्या अडगळीला पडल्याचे चित्र दिसले होते. त्यामुळे पायी गस्तही केवळ फोटोसेशनपुरती न राहता प्रत्यक्षात गुन्हेगारीवर नियंत्रण आणणारी ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
आचारसंहितेत पोलिसांची ‘पायी गस्त’ मोहीम; कायदा-सुव्यवस्थेसाठी कडक पावले
|