राजकीय

नगरपरिषद निवडणुकीत राजकीय समीकरणांमध्ये उलथापालथ; शिंदे गटाने भाजपविरोधात रचली महायुती

Political equations in the municipal council elections have changed


By nisha patil - 11/17/2025 2:02:40 PM
Share This News:



 

पालघर :- राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्षांत राजकीय हालचालींना वेग आला आहे. महायुती आणि महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवली जाणार का, याबाबतची उत्सुकता असतानाच अनेक ठिकाणी पक्षांनी स्वबळाचा नारा दिला आहे. काही ठिकाणी मात्र स्थानिक परिस्थितीनुसार युतीचे प्रयोग करण्यात येत आहेत. याच दरम्यान पालघरमधून मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे.

डहाणू नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाने भाजपला मोठा धक्का दिला आहे. सिंधुदुर्गच्या धर्तीवर पालघरमध्येही भाजपविरोधात सर्व विरोधी पक्ष एकत्र आले असून एक नवा राजकीय समीकरण तयार होत आहे. डहाणू निवडणुकीसाठी शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीने, शिवसेना शिंदे गटाने आणि अजित पवार गटाने हातमिळवणी केली आहे.

स्थानिक पातळीवरील या निर्णयाला पक्षांकडून अधिकृत मान्यता मिळाली आहे. डहाणूमधील गेल्या काही काळातील 'एकाधिकारशाही' संपवण्यासाठी आम्ही एकत्र आलो असल्याची प्रतिक्रिया शिवसेना शिंदे गटाचे पालघर जिल्हा संपर्कप्रमुख आणि माजी आमदार रवींद्र फाटक यांनी दिली.

युतीकडून जागावाटपाची प्रक्रिया वेगात सुरू असून, सोमवारी मोठे शक्ती प्रदर्शन करून नगराध्यक्ष पदासह 27 उमेदवारांचे अर्ज दाखल केले जाणार आहेत. दरम्यान, डहाणूतील या नव्या युतीला ठाकरे गट आणि माकपचा छुपा पाठिंबा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात वेगाने पसरत आहे.


भाजपही मैदानात सज्ज; उमेदवारांचे अर्ज दाखल

दुसरीकडे, भाजपनेही डहाणू नगरपरिषद निवडणुकीची तयारी पूर्ण केली आहे. जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांनी नगराध्यक्ष पदासाठी तर अन्य 27 उमेदवारांनी सदस्यपदासाठी अर्ज दाखल केले आहेत. यावेळी खासदार डॉ. हेमंत सावरा उपस्थित होते.

पालघर परिसरात निवडणूक जवळ आल्यानंतर पक्षांतरालाही वेग आला असून, सोमवारी रात्री शिवसेना शिंदे गटातील काही महिला पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याची माहिती समोर आली आहे.


नगरपरिषद निवडणुकीत राजकीय समीकरणांमध्ये उलथापालथ; शिंदे गटाने भाजपविरोधात रचली महायुती
Total Views: 28