शैक्षणिक
तंत्रज्ञान स्वीकारासाठी शिक्षकांचा सकारात्मक दृष्टिकोन महत्त्वाचा: डॉ. दीपक ताटपुजे
By nisha patil - 12/1/2026 5:01:08 PM
Share This News:
कोल्हापूर, दि. १२ जानेवारी: बदलत्या शैक्षणिक तंत्रज्ञानाच्या स्वीकारासाठी शिक्षकांचा सकारात्मक दृष्टिकोन अत्यंत महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन पुणे येथील विद्यादीप फाउंडेशनचे संशोधक सल्लागार डॉ. दीपक ताटपुजे यांनी केले.शिवाजी विद्यापीठातील दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या वतीने पीएम-उषा योजनेंतर्गत “विविध विद्याशाखांच्या अध्यापन व अध्ययनासाठी ई-कन्टेन्ट विकसन आणि ऑनलाइन पेडॅगॉजी” या विषयावर आयोजित दोन दिवसीय कार्यशाळेत ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. वर्षा मैंदर्गी उपस्थित होत्या. यावेळी उपकुलसचिव विनय शिंदे, सहायक कुलसचिव दिलीप मोहाडीकर तसेच शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. ताटपुजे म्हणाले की, तंत्रज्ञान झपाट्याने बदलत असताना त्याचा शैक्षणिक वापर कसा करायचा, यामध्ये शिक्षकांची भूमिका निर्णायक असते. आज विद्यार्थी केवळ वर्गात शिकत नाहीत; वर्गाबाहेरही ते विविध माध्यमांतून ज्ञान घेत आहेत. त्यामुळे शिक्षकांनी विषयाशी सुसंगत असा आपला दृष्टिकोन बदलून विद्यार्थ्यांना योग्य पद्धतीने ज्ञान द्यावे. ज्ञान व कौशल्य यांचा समन्वय साधत रोजगाराभिमुख शिक्षण देणे आवश्यक आहे. माहिती तंत्रज्ञानातील कौशल्ये आत्मसात करून ती ज्ञानाच्या दृष्टीने प्रभावीपणे मांडली पाहिजेत.
संचालक डॉ. कृष्णा पाटील म्हणाले की, ई-कन्टेन्ट विकसन म्हणजे केवळ साहित्यनिर्मिती नव्हे, तर सक्षम मनुष्यबळ निर्मिती आहे. दृष्टिकोन, कौशल्य आणि ज्ञान विकसित करण्यासाठी अशा कार्यशाळा उपयुक्त ठरतात. उच्च शिक्षणात हायब्रीड शिक्षण हे भविष्य असून गुणवत्तापूर्ण शिक्षण व डिजिटल कौशल्य वृद्धिंगत करण्यासाठी सर्वसमावेशक प्रयत्नांची गरज आहे.
अध्यक्षीय भाषणात डॉ. वर्षा मैंदर्गी म्हणाल्या की, ई-कन्टेन्ट ही आज काळाची गरज बनली आहे. माहिती तंत्रज्ञानामुळे शिक्षण क्षेत्रात झपाट्याने बदल होत असून बदलत्या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून दर्जेदार ज्ञान देणे आवश्यक आहे. दर्जेदार ई-कन्टेन्ट तयार करण्यासाठी तंत्रज्ञानाचा योग्य वापर अत्यंत महत्त्वाचा आहे.
डॉ.नितीन रणदिवे यांनी प्रास्ताविक केले. नाझिया मुल्लाणी यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. डॉ. नगीना माळी यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. चांगदेव बंडगर यांनी आभार मानले.
तंत्रज्ञान स्वीकारासाठी शिक्षकांचा सकारात्मक दृष्टिकोन महत्त्वाचा: डॉ. दीपक ताटपुजे
|