विशेष बातम्या

आजरा अन्याय निवारण समिती व नगरपंचायत मुख्याधिकारी यांच्या बैठकीत विविध मुद्यावर सकारात्मक चर्चा

Positive discussions on various issues in the meeting


By nisha patil - 10/27/2025 4:22:17 PM
Share This News:



आजरा अन्याय निवारण समिती व नगरपंचायत मुख्याधिकारी यांच्या बैठकीत विविध मुद्यावर सकारात्मक चर्चा
 

आजरा(हसन तकीलदार) :-आजरा नगरपंचयतीच्या निवडणूकीचे नगारे वाजू लागले आहेत. जवळपास अडीच तीन वर्षाचा कालावधी उलटून गेला तरी निवडणूक लागली नव्हती त्यामुळे नगरपंचायतीमध्ये कामांचा बोजावरा उडाला आहे. नागरिकांच्या प्राथमिक सुविधा पुरवण्यासाठी आणि समस्या सोडवण्यासाठी नगपंचायत प्रशासनाची दमछाक होताना दिसून येत आहे. भटक्या कुत्र्यांचा प्रश्न, रस्त्यावरील खड्डे, चिखल, गटारिंचा प्रश्न, रस्त्यावरील दिव्यांचा अडकलेला प्रश्न तसेच नवीन पाणी योजनेच्या कामाचा दर्जा अशा अनेकविध समस्या घेऊन आजरा रहिवासी अन्याय निवारण समितीने निवेदने दिली, चर्चा केली परंतु ठोस पावले उचलली गेली नाहीत यासाठी आज नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सूरज सुर्वे यांचे सोबत अन्याय निवारण समितीने सांगोपांग चर्चा केली. सकारात्मक चर्चा झाली असली तरी चर्चेचे फलित अजून येणे बाकी आहे.
     

या बैठकीत समितीकडून सादर करण्यात आलेल्या निवेदनांमधील विविध मागण्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. आजरा शहर व उपनगरातील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या त्रासाबाबत समितीमार्फत सर्वपक्षीय नागरिकांच्या उपस्थितीत दिनांक १०/१०/२०२५ रोजी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. तथापि, नगरपंचायतीच्या दिनांक ०९/१०/२०२५ रोजी दिलेल्या पत्राचा आदर ठेवून मोर्चा स्थगित करण्यात आला होता. या संदर्भातील कार्यवाहीची सद्यस्थिती बैठकीत विचारण्यात आली. यावर मुख्याधिकारी यांनी आवश्यक तांत्रिक बाबींची पूर्तता करून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त  लवकरच करण्यात येईल, असे आश्वासन दिले.नवीन जल अमृत योजना  माहिती अधिकारातील माहिती प्रमाणे आजरा शहरासाठी सुरू असलेल्या नवीन जल अमृत योजनेबाबत समितीने माहिती अधिकारांतर्गत मागविलेल्या माहितीसंदर्भात दोन ते तीन दिवसांत संबंधित माहिती प्रदान करण्यात येईल सांगण्यात आले.शहर व उपनगरातील विविध भागांत सध्या सिमेंट काँक्रीट रस्त्यांची कामे सुरू आहेत.

समितीकडून सूचित करण्यात आले की, नवीन पाणी पुरवठा योजनेतील पाणी प्रत्येक घरात योग्य दाबाने पोहोचत असल्याची खातरजमा केल्याशिवाय रस्त्यांचे व गटारीचे बांधकाम सुरू करू नये. या संदर्भात मुख्याधिकारी यांनी संबंधित विभागास प्रथम पाणीपुरवठा योजना पूर्ण करूनच रस्त्यांची बांधणी करावी अशा सूचना देण्यात येतील असे नमूद केले.शहरात जुन्या पाईप लाईनमधून मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती होत असून त्यामुळे पाण्याची नासाडी होत आहे, अशी तक्रार समितीकडून करण्यात आली. यावर मुख्याधिकारी यांनी गळती दूर करून पाण्याची नासाडी रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन दिले.
 

बैठकीदरम्यान नवीन पाणीपुरवठा योजना तातडीने पूर्ण करून शहरातील प्रत्येक घरात शुद्ध व पुरेशा दाबाने पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली जाईल, असेही मुख्याधिकारी यांनी स्पष्ट केले.बैठकित सकारात्मक चर्चा झाली असली तरी या बैठकीच्या फलीतासाठी पुढील काही दिवसासाठी वाट पहावी लागणार आहे.
 

यावेळी चर्चेमध्ये नगरपंचायत मुख्याधिकारी, प्रशासन तसेच अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे (भाऊजी), उपाध्यक्ष गौरव देशपांडे, जावेदभाई पठाण, जोतिबा आजगेकर, दिनकर जाधव, मदन तानवडे, मिनिन डिसोझा, रामचंद्र पंडित आदिजणांनी भाग घेतला.


आजरा अन्याय निवारण समिती व नगरपंचायत मुख्याधिकारी यांच्या बैठकीत विविध मुद्यावर सकारात्मक चर्चा
Total Views: 349