ताज्या बातम्या
कॅलिफोर्नियाला शक्तिशाली वादळाचा तडाखा; मुसळधार पावसामुळे पूर-भूस्खलन, आणीबाणी घोषित
By nisha patil - 12/26/2025 2:58:44 PM
Share This News:
लॉस एंजलिस :- जगभरात नाताळचा सण उत्साहात साजरा होत असतानाच अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्याला शक्तिशाली वादळाने जबर तडाखा दिला आहे. जोरदार वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली असून काही ठिकाणी भूस्खलनाच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे पाण्यात अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी बचावकार्य राबविण्यात येत असून धोकादायक भागांतून स्थलांतराचे आदेश देण्यात आले आहेत.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, दक्षिण कॅलिफोर्नियात या काळात दरवर्षी सरासरी अर्धा ते एक इंच पाऊस पडतो. मात्र यंदा अनेक भागांत चार ते आठ इंचांपर्यंत पावसाची नोंद झाली आहे. पर्वतीय भागांत याहून अधिक पाऊस पडल्याची माहिती देण्यात आली असून जोरदार वाऱ्यांसह बर्फवृष्टीचा इशाराही जारी करण्यात आला आहे.
हवामान विभागाने याआधीच इशारा दिला होता की, यंदाच्या नाताळच्या काळात दक्षिण कॅलिफोर्नियात गेल्या काही वर्षांतील सर्वाधिक पाऊस पडू शकतो. त्यामुळे अचानक पूर, भूस्खलन आणि वाहतूक ठप्प होण्याचा धोका निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर सहा काउंटीमध्ये आणीबाणी घोषित करण्यात आली आहे.
यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीला, जानेवारी महिन्यात वणव्यांचा सामना केलेल्या भागांमध्ये विशेष खबरदारी घेण्यात येत असून तेथेही स्थलांतराचे आदेश देण्यात आले आहेत. पूर आणि वादळाचा धोका लक्षात घेता सुमारे २० घरांतील रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
लॉस एंजलिसच्या ईशान्येस सुमारे १३० किलोमीटर अंतरावर असलेल्या सॅन गॅब्रियल पर्वतरांगेतील राईटवूड शहराकडे जाणाऱ्या रस्त्यावर चिखलमाती वाहून आल्याने काही नागरिक वाहनांमध्ये अडकले होते. अनिशमन दलाने तातडीने कारवाई करत त्यांची सुखरूप सुटका केली. या बचावकार्याचे व्हिडिओ अनिशमन दलाने सोशल मीडियावर प्रसिद्ध केले आहेत.
मुसळधार पावसामुळे दक्षिण कॅलिफोर्नियातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले असून बर्बँक विमानतळाजवळील इंटरस्टेट-५ महामार्गासह अनेक प्रमुख मार्ग बंद करण्यात आले आहेत. हंगामी नद्यांना पूर आल्याने नागरिकांच्या घरासमोरून वेगाने पाणी वाहताना दिसत आहे. अनिशमन दल आणि प्रशासनाकडून घरोघरी जाऊन रहिवाशांची तपासणी करण्यात येत आहे.
पाऊस सुरूच राहण्याचा अंदाज असल्याने सॅन गॅब्रियल पर्वतरांगेतील लिटल क्रीक परिसरातही स्थलांतराचे आदेश देण्यात आले आहेत. वादळाचे थैमान सुरूच राहिल्यास नाताळच्या सुट्ट्यांवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे
कॅलिफोर्नियाला शक्तिशाली वादळाचा तडाखा; मुसळधार पावसामुळे पूर-भूस्खलन, आणीबाणी घोषित
|