बातम्या
प्रभाग १२ मधील ड्रेनेज समस्येवर नगरसेवक आश्किन आजरेकर आक्रमक
By nisha patil - 4/28/2026 7:18:52 PM
Share This News:
प्रभाग १२ मधील ड्रेनेज समस्येवर नगरसेवक आश्किन आजरेकर आक्रमक
अतिरिक्त आयुक्तांसमवेत प्रत्यक्ष पाहणी करून तातडीने उपाययोजनांचे निर्देश
कोल्हापूर: प्रभाग क्रमांक १२ मधील ट्रेझरी ऑफिस चौक, स्वयंभू मंदिर पिछाडीस असलेली गल्ली, कोंबडी बाजार, बिनखांबी गणेश मंदिर आणि शाहू मॅरेथॉन चौक या परिसरात गेल्या काही दिवसांपासून ड्रेनेज आणि गटरचे पाणी रस्त्यावर ओव्हरफ्लो होत आहे. या गंभीर समस्येची दखल घेत नगरसेवक श्री. आश्किन आजरेकर यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे आज महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने या भागाची संयुक्त पाहणी करण्यात आली.
कालच जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री ना. प्रकाश आबिटकर आणि महानगरपालिका आयुक्त यांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीत शहराच्या ड्रेनेज प्रश्नावर चर्चा झाली होती. त्याच अनुषंगाने आज अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्या समवेत प्रभाग १२ मधील विविध ठिकाणांची फिरती करण्यात आली.
महत्त्वाचे निर्णय व कार्यवाही:
१. तात्काळ सफाई: स्वयंभू गणेश मंदिर, लक्ष्मीपुरी मूग पॅसेज, मिरची बोर्ड, कोंबडी बाजार आणि बिनखांबी गणेश मंदिर या ठिकाणी रस्त्यावर वाहणारे पाणी त्वरित रोखण्यासाठी चॅनल सफाई करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
२. नवीन इस्टिमेट: या भागातील जुने चॅनल बदलून लक्ष्मीपुरीच्या धर्तीवर नवीन ड्रेनेज लाईनचे इस्टिमेट तातडीने तयार करण्याचे आदेश शहर अभियंत्यांना दिले आहेत.
३. पर्यटकांची गैरसोय: श्री क्षेत्र अंबाबाई दर्शनासाठी येणाऱ्या पर्यटकांची आणि स्थानिक नागरिकांची दुर्गंधी व सांडपाण्यामुळे होणारी गैरसोय थांबवण्यासाठी युद्धपातळीवर काम करण्याचे निर्देश दिले आहेत.
या पाहणी दौऱ्याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, शहर अभियंता रमेश मस्कर, उप शहर अभियंता सुरेश पाटील, ड्रेनेज विभागाचे पाटणकर, सॅनिटरी इन्स्पेक्टर व इतर अधिकारी उपस्थित होते. तसेच प्रभाग १२ चे नगरसेवक आदिल फरास आणि राजू मुळीक यांनीही या दौऱ्यात सहभाग घेतला.
नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खपवून घेतला जाणार नाही आणि या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढला जाईल, असा विश्वास नगरसेवक आश्किन आजरेकर यांनी यावेळी व्यक्त केला.
प्रभाग १२ मधील ड्रेनेज समस्येवर नगरसेवक आश्किन आजरेकर आक्रमक
|