बातम्या
‘स्व’ जागृतीमधून देशाचा अभ्युदय- रा.स्व.संघ प्रचार विभाग प्रमुख प्रमोद बापट यांचे मत.
By nisha patil - 5/5/2026 2:47:45 AM
Share This News:
‘स्व’ जागृतीमधून देशाचा अभ्युदय- रा.स्व.संघ प्रचार विभाग प्रमुख प्रमोद बापट यांचे मत.
कोल्हापूर, ता. ३ ः मानवी मुल्यांची शिकवण देणारी संस्कृती. पराक्रमी इतिहास. ज्ञानाचा अखंड प्रवाह असणारी शिक्षण व्यवस्था याचा विसर आपल्याला पडला. त्यामुळे आपण पारतंत्र्यात गेलो. आजही जीवनाच्या प्रत्येक्ष क्षेत्रात स्वबोधाचा अभाव दिसतो. या ‘स्व’ ची जागृती केल्याशिवाय देशाचा अभ्युदय होणार नाही.
असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे क्षेत्र प्रचार विभाग प्रमूख प्रमोद बापट यांनी केले. संघ शताब्दी मंथन या कार्यक्रमात आज ते बोलत होते. रा.स्व.संघाच्या कार्यालयात हा कार्यक्रम झाला.
या कार्यक्रमात जिल्ह्यातील कलाकार, पत्रकार, लेखक, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सहभागी झाले होते. यावेळी प्रमोद बापट म्हणाले, ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शंभर वर्षे पूर्ण झाली हा प्रवास जाणून घेण्यासाठी आपल्याला कार्यकर्त्याच्या मानसिकतेतून विचार करावा लागेल. कारण मी पासून आम्ही पर्यंतचा हा प्रवास आहे. स्वतःला विसरून "आम्ही"त्व जागृत करणे हे संघाचे काम आहे. यातूनच संघ हे तत्व समाजाशी एकरूप झाले. आज समाजासमोर अनेक आव्हाने आहेत. ही आव्हाने ही पाश्चात्य विचारांच्या अंधानुकरणातून निर्माण झाली. कारण आपण आपला स्वत्व विसरलो. त्यातून आपल्यामध्ये पारतंत्र्याची मानसिकता तयार झाली. ‘स्व’ जागृत करणे आणि त्याप्रमाणे कृती करणे हाच देशाच्या अभ्युदयाचा मार्ग आहे. संघाने शताब्दी वर्षामध्ये हाच विचार देशासमोर ठेवला. आता प्रबोधन, जागरण नव्हे तर कृती करण्याची वेळ आहे.’
रा.स्व.संघाचे विभाग सहकार्यवाह संजय भागवत यांनी पंचपरिवर्तनची मांडणी केली. पर्यावरण, नागरी कर्तव्य, कुटुंब प्रबोधन, सामाजिक समरसता आणि स्वदेशी या पाच संकल्पनांची मांडणी करून सामान्य माणूस या दृष्टीने काय करू शकतो याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. समारोप शहर संघचालक प्रमोद ढोले यांनी तर स्वागत आणि प्रास्ताविक विवेक मंद्रुपकर यांनी केले. सूत्रसंचालन सुशांत दावणे यांनी केले.
-------------------------------
‘स्व’ जागृतीमधून देशाचा अभ्युदय- रा.स्व.संघ प्रचार विभाग प्रमुख प्रमोद बापट यांचे मत.
|