बातम्या
मुख्याध्यापक पद मंजुरी घोटाळा : बोगस कागदपत्र बनविणारा शिक्षक महेंद्र म्हैसकर अटकेत
By nisha patil - 4/19/2025 4:56:40 PM
Share This News:
मुख्याध्यापक पद मंजुरी घोटाळा : बोगस कागदपत्र बनविणारा शिक्षक महेंद्र म्हैसकर अटकेत
मुख्याध्यापक पदासाठी बोगस कागदपत्रांच्या आधारे मंजुरी मिळविल्याच्या प्रकरणात पोलिसांना आणखी एक मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणात बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या शिक्षकाला अटक करण्यात आली असून, अटक केलेल्या आरोपींची संख्या आता सहा झाली आहे.
ही कारवाई गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव येथील न्यू मॉडेल स्कूलमध्ये शिक्षक असलेल्या महेंद्र भाऊराव म्हैसकर (वय ४४, रा. आवळेनगर, टेकानाका) याच्यावर करण्यात आली. म्हैसकरने अर्धवट माहितीच्या आधारे कागदपत्रे तयार करताना काही शुल्लक चुका केल्या. यामुळेच तो पोलिसांच्या रडारवर आला व गुरुवारी सायंकाळी त्याला अटक करण्यात आली.
या प्रकरणाचा मुख्य आरोपी पराग नानाजी पुडके याला शिक्षक पदाचा कोणताही अनुभव नसतानाही मुख्याध्यापक बनविण्यात आले होते. त्याने नागपूर येथील एस. के. बी. उच्च प्राथमिक, माध्यमिक विद्यामंदिर, यादवनगर या शाळेची बनावट कागदपत्रे तयार करून त्याच्या आधारावर उपसंचालक उल्हास नरड यांच्यामार्फत नानाजी पुडके विद्यालय, जेवताळा (ता. लाखनी, जि. भंडारा) येथे मुख्याध्यापक पदासाठी मंजुरी मिळवली होती.
या प्रकरणात पोलिसांनी उपसंचालक उल्हास नरड यांच्यासह पाच जणांना आधीच अटक केली आहे. आरोपी पुडके व नरड यांची चौकशी केल्यानंतर म्हैसकर याचे नाव समोर आले. चौकशीत त्यानेच कागदपत्रे तयार केल्याची कबुली दिली आहे.
पुढील तपास सुरू असून, या प्रकरणात अजून काही नावे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
मुख्याध्यापक पद मंजुरी घोटाळा : बोगस कागदपत्र बनविणारा शिक्षक महेंद्र म्हैसकर अटकेत
|