बातम्या
सीपीआरमध्ये खासगी लॅब रॅकेट?— डॉक्टर–लॅब संगनमताने रुग्ण लुबाडल्याचा स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचा आरोप
By nisha patil - 11/28/2025 3:22:09 PM
Share This News:
सीपीआरमध्ये खासगी लॅब रॅकेट?— डॉक्टर–लॅब संगनमताने रुग्ण लुबाडल्याचा स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचा आरोप
कोल्हापूर | सीपीआर रुग्णालयात काही डॉक्टर आणि खासगी रक्त तपासणी लॅबचालक यांच्यातील संगनमताचा धक्कादायक प्रकार समोर आल्याचा गंभीर आरोप स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष रुपेश पाटील यांनी केला आहे. गरीब रुग्णांच्या नातेवाइकांची हजारो रुपयांनी लुबाडणूक होत असल्याचा सनसनाटी खुलासा त्यांनी गुरुवारी सीपीआरमध्ये अचानक भेट देऊन केला.
पाटील यांनी सांगितले की, सीपीआरमध्ये शासकीय रक्त तपासणी लॅब असतानाही, काही डॉक्टर मुद्दाम खासगी लॅबचालकांना आत बोलावून चाचण्यांसाठी दोन ते अडीच हजार रुपये आकारत आहेत. एवढेच नव्हे, रक्त तपासणीचे रिपोर्ट रुग्णांना न देता थेट डॉक्टरांच्या व्हॉटसॲपवर पाठवले जात असल्याचा धक्कादायक प्रकार त्यांच्या निदर्शनास आला.
गुरुवारी प्रत्यक्ष पाहणीदरम्यान फक्त एक तासात २५ ते ३० रुग्णांच्या नातेवाइकांनी अशाच तक्रारी केल्या. विशेष म्हणजे हे सर्व प्रकार प्रसूती विभागाच्या परिसरात घडत असल्याचे समोर आले. आर्थिक अडचणीतून सरकारी रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या गरिबांवर कमिशनखोरीचा कच्चा धंदा सुरू असल्याचा आरोप पाटील यांनी केला.
या गंभीर प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सीपीआरचे अधिष्ठाता सदानंद भिसे म्हणाले,
“खासगी लॅब चालकांना शासकीय रुग्णालयात येण्यास परवानगीच नाही. या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी समिती नेमली जाईल आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.”
सीपीआरमधील या कथित रॅकेटचा पर्दाफाश झाल्यानंतर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांकडून कठोर कारवाईची मागणी होत आहे.
सीपीआरमध्ये खासगी लॅब रॅकेट?— डॉक्टर–लॅब संगनमताने रुग्ण लुबाडल्याचा स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचा आरोप
|