शैक्षणिक
चंदगडच्या प्रियांका पाटीलला ‘रिव्हॉल्व्हर ऑफ ऑनर’; पोलिस उपनिरीक्षक प्रशिक्षणात पाच पारितोषिकांची कमाई
By nisha patil - 12/25/2025 11:14:41 AM
Share This News:
“माझी लेक एक दिवस पोलिस उपनिरीक्षक होईल,” असे स्वप्न सैन्यात कार्यरत असलेले शांताराम पाटील यांनी मनाशी बाळगले होते. मात्र कोरोनाच्या काळात नियतीने त्यांचे पितृछत्र हिरावले. तरीही त्या स्वप्नावर माती पडू दिली नाही. ते स्वप्न साकार करणारी त्यांची लेक म्हणजे चंदगड तालुक्यातील शकनहट्टी (जक्कनहट्टी), जिल्हा कोल्हापूर येथील प्रियांका शांताराम पाटील.
अवघ्या साडेचारशे लोकवस्तीच्या छोट्याशा गावातून आलेल्या प्रियांकाने केवळ पोलिस उपनिरीक्षक पद मिळवले नाही, तर महाराष्ट्र पोलिस अकादमी, नाशिक येथील प्रशिक्षणात उल्लेखनीय कामगिरी करत पाच मानाची पारितोषिके पटकावली. तिने ‘उत्कृष्ट प्रशिक्षणार्थी’ ठरत सर्वांत मानाचा ‘रिव्हॉल्व्हर ऑफ ऑनर’ सन्मान मिळवला. हा सन्मान म्हणजे दिवंगत वडिलांना दिलेले मौन अभिवादन असल्याची भावना कुटुंबीयांनी व्यक्त केली.
प्रियांकाने प्रशिक्षण काळात झोकून देत कामगिरी केली असून तिला
– रिव्हॉल्व्हर ऑफ ऑनर,
– डॉ. बाबासाहेब आंबेडकर कप (बेस्ट कॅडेट इन लॉ),
– अहिल्याबाई होळकर कप (बेस्ट ऑलराउंड वूमन कॅडेट),
– एन. एम. कामटे गोल्ड कप (बेस्ट कॅडेट इन शूटिंग),
– यशवंतराव चव्हाण गोल्ड कप (बेस्ट ऑलराउंड कॅडेट / बेस्ट कॅडेट इन स्टडीज)
अशी पाच प्रतिष्ठित पारितोषिके मिळाली आहेत.
या यशाबद्दल बोलताना प्रियांका म्हणाली, “आजच्या या आनंदाच्या क्षणी मला माझ्या वडिलांची प्रकर्षाने आठवण येते. आयुष्यात अनेक अडचणी आल्या, पण धैर्याने त्यांना सामोरे गेल्यामुळे अंतिम ध्येय गाठता आले.”
प्रियांका पाटील यांची नियुक्ती नाशिक शहरात पोलिस उपनिरीक्षक म्हणून करण्यात आली आहे. त्या जक्कनहट्टी गावच्या पहिल्या महिला पोलिस उपनिरीक्षक तसेच पहिल्या अधिकारी ठरल्या असून त्यांच्या यशाबद्दल चंदगड तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. कठोर परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर प्रियांकाने आई-वडिलांचे स्वप्न साकार करत अनेक तरुणींना प्रेरणा दिली आहे.
चंदगडच्या प्रियांका पाटीलला ‘रिव्हॉल्व्हर ऑफ ऑनर’; पोलिस उपनिरीक्षक प्रशिक्षणात पाच पारितोषिकांची कमाई
|