ताज्या बातम्या
कोल्हापूर जिल्ह्यात २१ जानेवारीपर्यंत बंदी आदेश लागू; अपर जिल्हादंडाधिकारी यांचे निर्देश
By nisha patil - 1/16/2026 10:52:55 AM
Share This News:
कोल्हापूर, दि. १५ : कोल्हापूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी गजानन गुरव यांनी संपूर्ण जिल्ह्यात बंदी आदेश जारी केले आहेत. पोलीस अधीक्षक, कोल्हापूर यांनी सादर केलेल्या अहवालातील सूचनांची दखल घेत प्रशासनाने हा खबरदारीचा निर्णय घेतला आहे. हे आदेश २१ जानेवारी २०२६ रोजी रात्री २४:०० वाजेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात लागू राहतील.
जिल्ह्यात विविध पक्ष आणि संघटनांकडून सातत्याने होणारी आंदोलने, उपोषणे, मोर्चे आणि रॅलींच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच आगामी काळात कोल्हापूर जिल्ह्यात विविध यात्रा, सण आणि उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होणार आहेत. या सर्व घडामोडींच्या काळात जिल्ह्यात शांतता भंग होऊ नये, यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ च्या कलम ३७ (१) अ ते फ आणि कलम ३७ (३) नुसार हे निर्बंध लादण्यात आले आहेत.
या आदेशानुसार, जिल्ह्यात शस्त्रे, बंदुका, तलवारी, लाठ्या-काठ्या किंवा शारीरिक इजा पोहोचवू शकतील अशी कोणतीही वस्तू जवळ बाळगण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. तसेच ज्वालाग्रही किंवा स्फोटक पदार्थ वाहून नेणे, दगड किंवा तत्सम शस्त्रे साठवणे, व्यक्तींच्या प्रतिमांचे दहन करणे आणि सार्वजनिक ठिकाणी आक्षेपार्ह घोषणाबाजी, गाणी किंवा वाद्ये वाजवून शांततेस बाधा निर्माण करणे यावरही बंदी घालण्यात आली आहे. जिल्ह्यात ५ किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी विनापरवाना एकत्रित जमणे, मिरवणुका काढणे आणि सभा घेण्यास या आदेशाद्वारे प्रतिबंध करण्यात आला आहे.
या आदेशातून काही महत्त्वाच्या बाबींना वगळण्यात आले आहे. शासकीय कर्तव्य बजावणारे अधिकारी-कर्मचारी, लग्न समारंभ, धार्मिक कार्यक्रम, यात्रा आणि प्रेतयात्रा यांना हे निर्बंध लागू असणार नाहीत. तसेच ज्या व्यक्तींनी पोलीस अधीक्षक किंवा सक्षम प्राधिकाऱ्यांची रीतसर पूर्वपरवानगी घेतली आहे, त्यांना हे नियम शिथिल असतील. सर्व नागरिकांनी या आदेशाचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन अपर जिल्हादंडाधिकारी गजानन गुरव यांनी केले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात २१ जानेवारीपर्यंत बंदी आदेश लागू; अपर जिल्हादंडाधिकारी यांचे निर्देश
|