बातम्या
गायरान जमिनीच्या वादातून वठार तर्फ वडगाव ग्रामस्थांचे आंदोलन पेटले
By nisha patil - 8/19/2025 6:06:34 PM
Share This News:
गायरान जमिनीच्या वादातून वठार तर्फ वडगाव ग्रामस्थांचे आंदोलन पेटले
१५ ऑगस्टपासून सुरु साखळी उपोषण; मागण्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
वठार तर्फ वडगाव (ता. हातकणंगले) येथील ग्रामस्थांनी गावाच्या हक्काची गायरान जमीन (गट क्र. 113 'ब') खाजगी शिक्षण संस्थेला देण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अन्यायकारक आदेशाविरोधात जोरदार आंदोलन छेडले आहे. गावकऱ्यांनी १५ ऑगस्टपासून साखळी उपोषण सुरु केले असून, मागण्या मान्य न झाल्यास राष्ट्रीय महामार्ग (AH 48 / NH4) बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, गायरान जमिनीवरील सात एकर क्षेत्र बनावट कागदपत्रांच्या आधारे बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ, अंबप (ता. हातकणंगले) या खाजगी संस्थेला पट्ट्याने देण्यात आले. या संस्थेचे सरकारमधील संपर्क वापरून जिल्हाधिकाऱ्यांवर राजकीय दबाव आणल्याचा आरोप करण्यात आला आहे.
ग्रामपंचायत व गावकऱ्यांनी या निर्णयाविरोधात वारंवार निवेदने दिली, आंदोलन केले. ११ ऑगस्ट रोजी ‘होळी आंदोलन’ करून बनावट कागदपत्रांची होळी करण्यात आली होती. मात्र जिल्हाधिकारी कार्यालयाने कोणतीही दखल घेतली नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यातच संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी पोलिसांकडे केला आहे.
आंदोलनातील प्रमुख मागण्या :
1. जिल्हाधिकाऱ्यांचा अन्यायकारक आदेश रद्द करावा.
2. गट नं. 113 'ब' ची जमीन पुन्हा गायरान म्हणून घोषित करून ग्रामपंचायतीकडे द्यावी.
3. बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या संस्थेवर कडक कायदेशीर कारवाई करावी.
4. संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करून, चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना निलंबित करावे.
ग्रामपंचायत, गट नं.113 'ब' जमीन बचाव कृती समिती व ग्रामस्थ यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरु असून, गावाला मोठ्या प्रमाणावर जनसहभाग व राजकीय पाठिंबा मिळत आहे.
गायरान जमिनीच्या वादातून वठार तर्फ वडगाव ग्रामस्थांचे आंदोलन पेटले
|