बातम्या

*धनगरमोळा येथील प्राथमिक शाळेत व अंगणवाडीमध्ये आवश्यक सुविधा द्या -गटविकास अधिकारी यांना निवेदन

Provide necessary facilities at the primary school


By nisha patil - 8/10/2026 11:44:10 PM
Share This News:



*धनगरमोळा येथील प्राथमिक शाळेत व अंगणवाडीमध्ये आवश्यक सुविधा द्या -गटविकास अधिकारी यांना निवेदन

*आजरा(हसन तकीलदार):-धनगरमोळा ता. आजरा येथील प्राथमिक शाळा व अंगणवाडीमध्ये आवश्यक त्या मूलभूत भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी शाळा वाचवा, शिक्षण वाचवा मंच,आजरा यांच्या तर्फे गटविकास अधिकारी, पंचायत समिती आजरा यांचेकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
     

निवेदनात म्हटले आहे की, धनगरमोळा प्राथमिक शाळेतील विजपुरवठा गेल्या वर्षभरापेक्षा अधिक काळापासून बंद असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच विद्यार्थ्यांसाठी असलेली मुला मुलींची स्वच्छतागृहे व मुतारी बंद अवस्थेत आहेत. शाळेमध्ये स्वच्छ व सुरक्षित पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध नाही. परिणामी विद्यार्थ्यांना अत्यंत गैरसोयीच्या परिस्थितीत शिक्षण घ्यावे लागत आहे. हीच परिस्थिती अंगणवाडीचीदेखील आहे. अंगणवाडीची इमारत उपलब्ध असूनही तेथे बालकांसाठी वीज, स्वछतागृह, पाणी तसेच स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध नाही. बालकांच्या आरोग्याचा व सुरक्षिततेच्या दृष्टीने ही बाब अत्यंत गंभीर आहे.
   

शासनाच्या विविध योजनाद्वारे प्रत्येक बालकाला शिक्षणाचा अधिकार, सुरक्षित शैक्षणिक वातावरण आणि आवश्यक सुविधा मिळणे अपेक्षित आहे. मात्र प्रत्यक्षात ग्रामीण भागातील शाळामध्ये मूलभूत सुविधाचीच कमतरता असल्याचे चित्र दिसून येत आहे. याशिवाय शाळांमध्ये असलेली विविध अतिरिक्त प्रशासकीय व अशैक्षणिक कामे तसेच आवश्यक भौतिक सुविधाचा अभाव यामुळे शिक्षकांचे शैक्षणिक कामाकडे होणारे दुर्लक्ष विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम करणारे ठरू शकते. याचा अप्रत्यक्ष परिणाम शाळेच्या पटसंख्येवर होऊन शाळा बंद पडू शकते. शाळा टिकवायच्या असतील तर यासर्व मूलभूत भौतिक सुविधाची उपलब्धता करून देणे प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे या सर्व भौतिक सुविधाची उपलब्धता तातडीने करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
   

निवेदनावर कॉ. प्रकाश मोरूस्कर, कृष्णा खरूडे, परशुराम खरुडे, मारुती होडगे, संतोष शेटगे, कॉ. दत्ता कांबळे, नामदेव फगरे, नारायण भडांगे, मारुती पाटील आदींच्या सह्या आहेत.


*धनगरमोळा येथील प्राथमिक शाळेत व अंगणवाडीमध्ये आवश्यक सुविधा द्या -गटविकास अधिकारी यांना निवेदन
Total Views: 8