बातम्या

सार्वजनिक बांधकाम विभागाकडे डांबरच नाही; दत्तवाड–घोसरवाड राज्य महामार्गाचे काम  मार्च २०२६ पासून अर्धवट!

Public Works Department has no asphalt


By nisha patil - 11/26/2026 3:23:59 PM
Share This News:



सार्वजनिक बांधकाम विभागाकडे डांबरच नाही; दत्तवाड–घोसरवाड राज्य महामार्गाचे काम  मार्च २०२६ पासून अर्धवट!
 

बीबीएम करून डांबराचा अंतिम थर न मारल्याने नागरिकांचे हाल; कंबर आणि मणक्यांच्या त्रासात वाढ – काम तातडीने पूर्ण न केल्यास रास्ता रोको आंदोलनाचा इशारा
 

दत्तवाड प्रतिनिधी : आचिन हेरवाडे दत्तवाड–घोसरवाड राज्य महामार्गावरील बाळासाहेब माने हौसिंग सोसायटी ते नेजे हायस्कूल या दरम्यानच्या रस्त्याचे काम गेल्या वर्षी बीबीएम (ब्लॅक बेस मॅकॅडम) करून ठेवण्यात आले आहे. मात्र, त्यावर अद्याप डांबराचा अंतिम थर टाकून रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आलेले नाही. मार्च २०२६ पासून हा रस्ता अर्धवट अवस्थेत असल्याने वाहनधारकांसह परिसरातील नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
 

या रस्त्यावरून दररोज प्रवासी वाहतूक, दुचाकी, चारचाकी वाहने तसेच ज्येष्ठ नागरिकांची ये-जा सुरू असते. मात्र, बीबीएम केलेल्या रस्त्यावर डांबराचा अंतिम थर नसल्याने रस्ता खडबडीत आणि असमतोल झाला आहे. त्यामुळे वाहनांना मोठे धक्के बसत असून ज्येष्ठ नागरिक, प्रवासी आणि आजूबाजूच्या रहिवाशांना कंबरदुखी व मणक्यांच्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होत आहेत.
 

विशेष म्हणजे, या रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग, जयसिंगपूर यांच्या नियोजनाखाली सुरू आहे. मात्र, मार्च २०२6 पासून काम अपूर्ण असतानाही संबंधित विभागाकडून अद्याप अंतिम डांबरीकरण करण्यात आलेले नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे डांबर उपलब्ध नसल्यामुळे रस्त्याचे अंतिम काम रखडले आहे का? असा सवालही नागरिक उपस्थित करीत आहेत.
 

रस्त्याचे काम अर्धवट ठेवण्यामागचे नेमके कारण काय, डांबरीकरणासाठी निधी व साहित्य उपलब्ध नाही का आणि नागरिकांना आणखी किती दिवस या त्रासातून जावे लागणार, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
 

संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने या रस्त्याची पाहणी करून डांबराचा अंतिम थर टाकण्याचे काम पूर्ण करावे. अन्यथा नागरिकांना सोबत घेऊन या मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा स्थानिक नागरिकांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिला आहे.
आता सार्वजनिक बांधकाम विभाग जयसिंगपूर नागरिकांच्या या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन रस्त्याचे काम कधी पूर्ण करणार, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.


सार्वजनिक बांधकाम विभागाकडे डांबरच नाही; दत्तवाड–घोसरवाड राज्य महामार्गाचे काम  मार्च २०२६ पासून अर्धवट!
Total Views: 81