बातम्या
कोळींद्रे ता. आजरा येथे नैसर्गिक शेतीसाठी जनजागृती अभियान कार्यक्रम संपन्न
By nisha patil - 11/25/2026 4:02:29 PM
Share This News:
कोळींद्रे ता. आजरा येथे नैसर्गिक शेतीसाठी जनजागृती अभियान कार्यक्रम संपन्न
*आजरा(हसन तकीलदार):-तालुका कृषी अधिकारी कार्यालय, आजरा व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा,कोल्हापूर यांच्या वतीने खेत बचाओ अभियान कार्यक्रम अंतर्गत राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान अंतर्गत श्रीदेव रवळनाथ नैसर्गिक शेती शेतकरी गटाचे जनजागृती अभियान कार्यक्रम ग्रामपंचायत सभागृह मौजे कोळींद्रे तालुका आजरा आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमोद मोने (मंडळ कृषी अधिकारी आजरा) उपस्थित होते. या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक दयानंद देसाई बिजनेस हेड ग्रीन फ्रेंड्स इको मॅनेजमेंट सर्विसेस हिरलगे तालुका गडहिंग्लज यांनी माती परीक्षणाचे फायदे, माती नमुना काढण्याची पद्धत, माती परीक्षणानुसार खतांचा संतुलित वापर,सेंद्रिय शेती व सेंद्रिय खतांचे महत्त्व व त्याचे उत्पादनावर होणारा परिणाम याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच ऊस लागवड तंत्रज्ञान, ऊस पाचट व्यवस्थापन याबाबत शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्ताविक अमित यमगेकर (सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक,आजरा) यांनी केले. प्रस्ताविकेत यमगेकर यांनी राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान योजनेचे स्वरूप, योजनेत अंतर्भूत बाबी, रासायनिक खतांचा अतिवापर केल्यामुळे जमिनीवर होणारे दुष्परिणाम याबाबत माहिती दिली.
संदीप पाटील (जिल्हा समन्वय पिक विमा ) व सागर सुतार (तालुका समन्वयक पिक विमा) यांनी पीक विमा योजनेबाबत शेतकऱ्यांना सविस्तर माहिती दिली. यामध्ये योजनेचे स्वरूप, आवश्यक कागदपत्रे, नोंदणी प्रक्रिया याबाबत मार्गदर्शन केले. सौ स्वप्नाली मोहिते(सहाय्यक कृषी अधिकारी कोळींद्रे) यांनी आभार मानले. यावेळी श्रीदेव रवळनाथ नैसर्गिक शेती शेतकरी गटाचे अध्यक्ष आनंदा पाटील, उपाध्यक्ष बायाका मोहिते, सचिव जोतिबा देसाई, कोळिंद्रे गावच्या उपसरपंच दिपाली पाटील, कृषी सखी शितल भोसले, कोमल काटकर तसेच प्रगतशील शेतकरी प्रकाश पाटील, रमेश बुगडे व गटातील सर्व शेतकरी इ .उपस्थित होते
कोळींद्रे ता. आजरा येथे नैसर्गिक शेतीसाठी जनजागृती अभियान कार्यक्रम संपन्न
|