बातम्या

भारतीय संविधानाची प्रास्ताविका व्हाया उद्देशपत्रिका पुस्तकाचे प्रकाशन

Publication of the book Preamble


By nisha patil - 11/26/2026 3:03:20 PM
Share This News:



भारतीय संविधानाची प्रास्ताविका व्हाया उद्देशपत्रिका पुस्तकाचे प्रकाशन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत प्राचार्य डॉ. राजेखान शानेदिवाण लिखित भारतीय संविधानाची प्रास्ताविका व्हाया उद्देशपत्रिका या पुस्तकाचे प्रकाशन श्री छत्रपती शहाजी महाविद्यालयात प्रमुख व्याख्याते डॉ. विजय देठे, डॉ. ए. बी. बलुगडे, प्रकाशक अनिल म्हमाने, डॉ. डी. के. वळवी, डॉ. आर. जे. भोसले, डॉ. शोभा चाळके, डॉ. के.  एम.  देसाई, डॉ. एम. व्ही. भोसले प्रा.आर. आर. पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.
 

यावेळी डॉ. राजेखान शानेदिवाण म्हणाले, स्वातंत्र्यानंतरची ७८ वर्षे उलटली आहेत. देश प्रगती करीत आहे असे असले तरी एक अस्वस्थता मनाला व्यापून राहिली आहे. समाजातील सर्व स्तरातील लोकांना आपल्या भविष्याविषयी चिंता व्यापून राहिली आहे. आपल्या देशाची उभारणी ज्या मूल्यावर आधारलेली आहे त्या मूल्यांचा विसर नकळतपणे पडतो आहे की काय असे वाटण्यासारखी स्थिती आहे. मागील काही वर्षांमध्ये सर्व क्षेत्रात प्रचंड उलथापालथ झाली आहे. समाज सुधारक आणि विचारवंतांनी ज्या समाजाची धारणा मनात ठेवून राष्ट्र उभारणी व्हावी अशी मनोमन भावना बाळगली होती त्या भावनेला सुरुंग लावला जात असल्याची रास्त भीती मनात दाटते आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता या शब्दांचा विपरीत अर्थ शोधला जात आहे. माणसांची ओळख माणूस म्हणून होण्यापेक्षा धर्माच्या आधारे नवी ओळख देण्याचा प्रयत्न होत आहे. व्यक्तीच्या नावावरून देशभक्तीचा दाखला दिला जात आहे. अशा काळात भारतीय संविधान हा एकमेव आधार आहे. ज्याच्या आधारे भारतातील प्रत्येक व्यक्तीचे अस्तित आणि ओळख आबाधित राहू शकेल.
 

प्रमुख व्याख्याते डॉ. विजय देठे म्हणाले, देश चालवण्यासाठी भारतीय संविधान महत्त्वाचे असून भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेतून देशाबद्दलच्या मूलभूत तत्वाची जाणीव निर्माण होते. भारतीय उद्देश पत्रिकेची नेमकी भूमिका काय होती याचे प्रतिबिंब प्रास्ताविकेमध्ये पर्यायाने भारतीय संविधानामध्ये दिसून येते. आज संविधान बदलाच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर भारतीय संविधान समजून घेणे आणि ते अधिक मजबूत करणे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.
 

  श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री मानसिंग बोंद्रे यांचे या उपक्रमास प्रोत्साहन मिळाले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. आर. आर. पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. पी. के. पाटील यांनी केले, तर डॉ. के.  एम. देसाई यांनी आभार मानले.


भारतीय संविधानाची प्रास्ताविका व्हाया उद्देशपत्रिका पुस्तकाचे प्रकाशन
Total Views: 6