बातम्या
पेन्शनधारकांची फरफट थांबवा; SBI बँकेची यंत्रणा तातडीने सुरळीत करून पेन्शनधारकांची फरफट थांबवा.आजरा अन्याय निवारण समिती
By nisha patil - 12/11/2026 1:55:29 PM
Share This News:
पेन्शनधारकांची फरफट थांबवा; SBI बँकेची यंत्रणा तातडीने सुरळीत करून पेन्शनधारकांची फरफट थांबवा.आजरा अन्याय निवारण समिती
*आजरा(हसन तकीलदार):- स्टे बँक ऑफ इंडिया, आजरा शाखेमध्ये पेन्शनधारकांचे जीवन प्रमाणपत्र (Life Certificate) स्वीकारताना वारंवार तांत्रिक अडचणी येत असल्याने ज्येष्ठ नागरिकांना होत असलेल्या त्रासाबाबत सामाजिक सेवा प्रतिष्ठान आजरा प्रणीत अन्याय निवारण समितीच्या वतीने शाखा व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले. यावेळी संबंधित प्रश्नावर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच बँकेतील कर्मचाऱ्यांकडून तांत्रिक अडचणींच्या नावाखाली दिल्या जाणाऱ्या उत्तरांबाबत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.त्याचप्रमाणे वृद्ध पेन्शनधारकांना दिल्या जाणाऱ्या वागणुकीचा चांगलाच समाचार घेतला.
दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात पेन्शन सुरू ठेवण्यासाठी जीवन प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असते. त्यानुसार आजरा शहरासह ग्रामीण भागातील अनेक पेन्शनधारक जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी बँकेत येत आहेत. मात्र, बँकेतील सर्व्हर व तांत्रिक यंत्रणा वारंवार बंद पडत असल्याचे कारण सांगण्यात येत आहे. त्यामुळे पेन्शनधारकांना खासगी एजन्सीकडे पाठविण्यात येत असून, प्रत्येक पेन्शनधारकाला ५० रुपये अतिरिक्त खर्च करावा लागत असल्याच्या तक्रारी समितीकडे प्राप्त झाल्या आहेत.
या गंभीर प्रश्नावर बँक प्रशासनाकडून योग्य तोडगा काढण्याऐवजी तांत्रिक अडचणींची कारणे पुढे केली जात असल्याबाबत समितीने आक्षेप नोंदविला. बँकेतील कर्मचाऱ्यांकडून देण्यात येणाऱ्या उत्तरांवर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रतिप्रश्न उपस्थित करीत त्यांचा समाचार घेतला. बँकेची स्वतःची यंत्रणा असताना ज्येष्ठ नागरिकांना खासगी एजन्सीकडे जाण्याची वेळ का यावी? तांत्रिक बिघाड दूर करणे ही बँक प्रशासनाची जबाबदारी नाही का? असा सवाल उपस्थित करण्यात आला.
विशेषतः वयोवृद्ध, दिव्यांग आणि ग्रामीण भागातून येणाऱ्या पेन्शनधारकांना वारंवार बँकेत हेलपाटे मारावे लागत आहेत. त्यांचा वेळ, श्रम आणि आर्थिक नुकसान होत असून त्यांना मानसिक त्रासालाही सामोरे जावे लागत आहे. आयुष्यभर प्रामाणिकपणे सेवा बजावलेल्या ज्येष्ठ नागरिकांना स्वतःची हक्काची पेन्शन मिळविण्यासाठी अशा प्रकारचा त्रास सहन करावा लागणे ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याचे समितीने स्पष्ट केले.
समितीच्या वतीने बँकेतील संगणकीय यंत्रणा व सर्व्हर तातडीने दुरुस्त करून नियमित कार्यान्वित करणे, बँकेच्या शाखेतच जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देणे, आवश्यक बायोमेट्रिक उपकरणे व मनुष्यबळ उपलब्ध करणे, ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र कक्ष अथवा कर्मचारी नियुक्त करणे, तसेच जीवन प्रमाणपत्र सादर करताना पेन्शनधारकांवर कोणताही अनावश्यक आर्थिक भुर्दंड पडणार नाही, याची दक्षता घेणे अशा विविध मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या.
विशेष म्हणजे, समितीने उपस्थित केलेल्या प्रश्नांवर बँक कर्मचाऱ्यांकडून केवळ तोंडी उत्तरे देण्यात आली असली तरी त्यावर समाधान न मानता निवेदनातील सर्व मुद्द्यांबाबत बँक प्रशासनाने अधिकृत लेखी उत्तर द्यावे, अशी ठाम मागणी समितीने केली आहे.
पेन्शनधारकांना सन्मानपूर्वक, सुलभ आणि विनाविलंब बँकिंग सेवा मिळणे हा त्यांचा हक्क आहे. केवळ तांत्रिक अडचणींचे कारण पुढे करून ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय करणे योग्य नाही. बँक प्रशासनाने या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कार्यवाही करावी. अन्यथा पेन्शनधारकांच्या न्याय्य हक्कांसाठी अन्याय निवारण समितीला लोकशाही मार्गाने आंदोलन छेडावे लागेल, असा स्पष्ट इशाराही समितीच्या वतीने देण्यात आला.
यावेळी अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे, कार्याध्यक्ष डॉ. श्रद्धानंद ठाकूर, सचिव पांडुरंग सावरतकर,तसेच सदस्य बंडोपंत चव्हाण, संतोष बांदिवडेकर, संजय जोशी, दिनकर जाधव, जोतिबा आजगेकर, मदन तानवडे, रविंद्र नेवरेकर, दत्तात्रय सावंत, ऑगस्टीन नॉरोज ,विलास रावजीचे, लक्ष्मण नाईक आदीजण उपस्थित होते.
ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानाचा आणि हक्काच्या पेन्शनचा प्रश्न असल्याने बँक प्रशासनाने या निवेदनाची तातडीने दखल घेऊन लेखी उत्तरासह ठोस कार्यवाही करावी, अशी मागणी अन्याय निवारण समितीने केली आहे.
पेन्शनधारकांची फरफट थांबवा; SBI बँकेची यंत्रणा तातडीने सुरळीत करून पेन्शनधारकांची फरफट थांबवा.आजरा अन्याय निवारण समिती
|