बातम्या

कोल्हापूरात डिजिटल बोर्डवरून दोन गटांत राडा

Rada between two groups


By nisha patil - 8/23/2025 11:19:21 AM
Share This News:



कोल्हापूरात डिजिटल बोर्डवरून दोन गटांत राडा

तुफान दगडफेक, वाहनांची तोडफोड; परिसरात तणावपूर्ण शांतता
शहरात शुक्रवारी रात्री दोन गटांत तुफान राडा झाला. फुटबॉल क्लबच्या वर्धापन दिनानिमित्त उभारण्यात आलेल्या फलकावरून वाद निर्माण झाल्यानं हा प्रकार घडला. या राड्यात दोन्ही गटांमध्ये तुफान दगडफेक झाली, तर अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आली. काही गाड्यांना पेटवण्याचा प्रयत्नही झाला. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती नियंत्रणात आली असून परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.

छत्रपती प्रमिलाराजे चौकातून सोन्या मारुती चौकाकडे जाणाऱ्या मार्गावर, सिद्धार्थनगर उद्यानाजवळ फुटबॉल क्लबच्या 31 व्या वर्धापन दिनानिमित्त फलक उभारण्यात आला होता. हा फलक अनधिकृत असल्याची तक्रार लक्ष्मीपुरी पोलिसांकडे दाखल करण्यात आली होती. पोलीस निरीक्षक श्रीराम कणेरकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि फलक तसेच स्ट्रक्चर हटवण्यात आलं.

यानंतर काही तरुणांनी पुन्हा तो फलक उभारण्याचा प्रयत्न केला. यावरूनच दोन गट आमनेसामने आले. रात्री दोन्ही गटांतील सुमारे 200 कार्यकर्ते एकमेकांवर धावून गेले आणि दगडफेक सुरू झाली. या दरम्यान चारचाकी व दुचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले, तर रस्त्यालगतच्या दुकानांवरही दगडफेक करण्यात आली.


प्राथमिक टप्प्यात घटनास्थळी मोजकेच पोलीस असल्यामुळे जमाव आक्रमक बनला. मात्र, नंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी व मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी दोन्ही गटांच्या प्रमुखांना समजावून घेतलं आणि परिस्थिती ताब्यात घेतली. सुमारे तासभर चाललेल्या या धुमश्चक्रीत अनेक वाहनं उद्ध्वस्त झाली.

घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. पुढील अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस सतत गस्त घालत आहेत.

 


कोल्हापूरात डिजिटल बोर्डवरून दोन गटांत राडा
Total Views: 103