बातम्या

राईसमील ते गांधीनगर रस्त्याची दुरुस्ती करा

Raesmil to gandhinagar


By nisha patil - 2/7/2026 10:48:30 PM
Share This News:



**शिवसेना उबाठाचे आजरा नगरपंचायतिच्या मुख्यधिकाऱ्यांना निवेदन*

**राईसमील ते गांधीनगर रस्त्याची दुरुस्ती करा*

*आजरा (हसन तकीलदार)*:-राईसमील ते गांधीनगर येथील रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे.या रस्त्यावरील खड्ड्यामुळे वाहनधारकांना आणि पदचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे. या रस्त्यावरील खड्ड्यातील पाणी निचरा करून लवकरात लवकर खड्डे मुजवून घ्यावेत अन्यथा आंदोलन करण्यात येईल असे निवेदन शिवसेना उबाठा तर्फे आजरा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सूरज सुर्वे यांना दिले आहे.

  निवेदनात म्हटले आहे की, आजरा येथील राईसमील ते गांधीनगर हा रस्ता नगरपंचायतीच्या हद्दीत येतो. या रस्त्यावरून आजऱ्या पासून पुढे एरंडोळ, पोळगाव, खानापूर, इटे, चित्रीप्रकल्प अशी 10 ते 12 गावे जोडली आहेत. त्याचप्रमाणे गांधीनगर येथे ग्रामीण रुग्णालय असल्यामुळे अनेक रुग्णांना या रस्त्यावरून रुग्णवाहिकेतून घेऊन जात असताना अडचणी निर्माण होत आहेत.

खड्ड्यामुळे जलद व तातडीने रुग्णवाहीका नेता येत नाही वेळप्रसंगी रुग्ण दगावण्याची शक्यता आहे. एस. टी. सुद्धा याच रस्त्यावरून जात असते. रस्त्यावरील खड्ड्यामुळे प्रवाश्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे. सगळीकडे खड्डे असून या खड्ड्यातून पाणी साचले असल्यामुळे हे पाणी व चिखल रस्त्याने जाणाऱ्या विद्यार्थी आणि पदचाऱ्यांच्या अंगावर उडत असल्याने वाहन चालकांना नाहक रोष पत्कारावा लागत आहे. त्यामुळे तात्काळ या रस्त्याची डागडुगी करून खड्डे भरून घ्यावेत अन्यथा शिवसेनेच्या वतीने आपल्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

 यावेळी बोलताना तालुका प्रमुख युवराज पोवार म्हणाले की, राईसमिलजवळ चुकीच्या पद्धतीने गटार मारल्यामुळे गटारीतून पाण्याचा व्यवस्थित निचरा होत नाही त्यामुळे रस्त्यावरच पाणी साचून मोठा खड्डा पडला आहे. यासाठी व्यवस्थित पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य गटार तयार करणे गरजेचे आहे. गटार चुकीच्या पद्धतीने बांधण्यात आली आहे. संबंधित ठेकेदाराकडून गटार व्यवस्थित करून घेऊन पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने होईल याची दक्षता घेऊन पाण्याचा निचरा करूनच नंतर खड्डा भरणे गरजेचे असल्याचे सांगितले.

 यावेळी उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, शहर प्रमुख समीरभाई चांद, कामगारसेना शहरप्रमुख बिलाल लतीफ, युवासेना तालुका प्रमुख सुयश पाटील, संजयभाई सावंत(देऊळवाडी सरपंच), हरिश्चंद्र व्हराकटे, अमित गुरव आदिजण उपस्थित होते.


राईसमील ते गांधीनगर रस्त्याची दुरुस्ती करा
Total Views: 114