राजकीय
राहुल गांधींचा ‘हायड्रोजन बॉम्ब’! हरियाणा निवडणुकीवर मोठा गौप्यस्फोट — ब्राझीलच्या मॉडेलचं कनेक्शन काय?
By nisha patil - 5/11/2025 1:37:36 PM
Share This News:
नवी दिल्ली:- काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत हरियाणा विधानसभा निवडणुकीबाबत थरारक आणि धक्कादायक खुलासे केले आहेत. त्यांनी दावा केला की, “आम्ही महाराष्ट्र, कर्नाटक, हरियाणा आणि छत्तीसगडमध्ये मतचोरी पकडली आहे. आकडे पाहून माझा विश्वासच बसला नाही. माझ्या टीमला सांगितलं की, प्रत्येक आकडा वेगवेगळ्या स्त्रोतांमधून पुन्हा तपासा.”
पत्रकार परिषद घेण्यापूर्वी राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर “हायड्रोजन बॉम्ब येतोय” अशी पोस्ट करून चर्चेला उधाण आणलं होतं. त्यांनी सांगितलं की, “हरियाणात पोस्टल मतदानात काँग्रेस पुढे होती. एक्झिट पोलमध्ये आमचा विजय स्पष्ट दिसत होता. मात्र निकालात भाजपला 1.18 लाख मतांचा आघाडी दाखवण्यात आला.”
राहुल गांधी पुढे म्हणाले —
“हरियाणाच्या निवडणूक इतिहासात पहिल्यांदाच पोस्टल बॅलेट आणि प्रत्यक्ष मतांचा कल वेगळा होता. यापूर्वी दोन्हींचा कल एकसारखाच राहायचा. काँग्रेसचा केवळ 22,779 मतांनी पराभव झाला.”
यानंतर राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत एका युवतीचा फोटो दाखवला आणि धक्कादायक दावा केला की, “या युवतीने वेगवेगळ्या नावांनी तब्बल २२ ठिकाणी मतदान केलं आहे. कुठे सीमा, कुठे सरस्वती नावाने ती मतदार म्हणून दिसते. ही युवती प्रत्यक्षात ब्राझीलची मॉडेल आहे आणि ती हरियाणाच्या मतदार यादीत कशी काय आली?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
राहुल गांधी यांनी आणखी मोठा दावा करत सांगितले की, हरियाणातील पाच वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये तब्बल २५ लाख मतांची चोरी झाली आहे.
या आरोपांमुळे हरियाणा निवडणुकीबाबत राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेसकडून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.
राहुल गांधींचा ‘हायड्रोजन बॉम्ब’! हरियाणा निवडणुकीवर मोठा गौप्यस्फोट — ब्राझीलच्या मॉडेलचं कनेक्शन काय?
|