ताज्या बातम्या
नोव्हेंबर महिन्यातही राज्यात पावसाचे सावट; थंडी उशिरा सुरू होण्याची शक्यता, आयएमडीचा अंदाज
By nisha patil - 3/11/2025 12:30:26 PM
Share This News:
मुंबई : हिवाळ्याची चाहूल लागलेली असताना, यंदा नोव्हेंबर महिन्यातही राज्यासह देशभरात पावसाचे सावट कायम राहणार असल्याचे भारतीय हवामान विभागाने (IMD) भाकीत केले आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, या महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता असून त्यामुळे राज्यातील हवामानात पुन्हा एकदा बदल जाणवणार आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा आणि दक्षिणेकडील काही भागांमध्ये पावसाचे वातावरण तयार झाले आहे.
राज्यातील कोकण, विदर्भ आणि मराठवाडा या भागांत ५ ते ९ नोव्हेंबर दरम्यान हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि गारपीटीसह पावसाचा इशाराही देण्यात आला आहे. नोव्हेंबर महिन्यात साधारणपणे थंडीची सुरुवात होते, मात्र वारंवार पाऊस आणि हवामानातील बदलामुळे यंदा थंडी काही दिवस उशिरा जाणवण्याची शक्यता आहे.
दिवसाचे तापमान काहीसे जास्त राहील, तर सकाळी आणि संध्याकाळी सौम्य थंडी जाणवेल, असे हवामान खात्याचे म्हणणे आहे. या अवकाळी पावसाचा परिणाम रब्बी हंगामातील तूर, हरभरा, गहू आणि भाजीपाल्याच्या पिकांवर होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांना पिकांचे संरक्षण करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. तसेच, किनारपट्टी भागातील मच्छीमारांनी काही दिवस समुद्रात न जाण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
भारतीय हवामान विभागाने नागरिकांना नियमितपणे हवामान अपडेट्स पाहण्याचे आणि आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
नोव्हेंबर महिन्यातही राज्यात पावसाचे सावट; थंडी उशिरा सुरू होण्याची शक्यता, आयएमडीचा अंदाज
|