बातम्या
माणगाव येथील अल्पवयीन स्वरा उपाध्ये खून प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून दोषींना फाशी द्या; राजू शेट्टी यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.
By nisha patil - 10/20/2026 12:21:35 AM
Share This News:
माणगाव येथील अल्पवयीन स्वरा उपाध्ये खून प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून दोषींना फाशी द्या; राजू शेट्टी यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.
कोल्हापूर ( प्रतिनिधी) कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील माणगाव येथे घडलेल्या कु. स्वरा उपाध्ये या अल्पवयीन मुलीच्या अमानुष खून प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरले आहे. या पार्श्वभूमीवर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विमानतळावर भेट घेऊन दोषींना तात्काळ कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे.
राजू शेट्टी यांनी पत्रात म्हटले आहे की, "माणगाव येथील निष्पाप आणि अल्पवयीन स्वरा उपाध्ये हिची झालेली हत्या अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक आहे. या अघोरी आणि पाशवी कृत्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.अशा क्रूर प्रवृत्तींना समाजात कायद्याचा कोणताही धाक उरलेला नाही, हेच या घटनेतून पुन्हा एकदा सिद्ध होत आहे.
यामुळे या अत्यंत संवेदनशील प्रकरणाचा तपास पोलिसांनी अत्यंत वेगाने आणि सखोल पद्धतीने करावा व या नराधमांविरोधातील हा खटला 'फास्ट ट्रॅक कोर्टात' (जलद गती न्यायालयात) चालवून त्याचा तात्काळ न्यायनिवाडा करण्यात यावा.पीडित स्वरा आणि तिच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी, तसेच समाजात कडक संदेश देण्यासाठी गुन्हेगारांना 'फाशीचीच' कठोरतम शिक्षा देण्यात यावी.
या घटनेची गांभीर्याने दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ पावले उचलली आहेत. त्यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा आणि जिल्हा पोलीसप्रमुख निलोत्पल यांना या प्रकरणाचा तपास अत्यंत वेगाने करून दोषींवर कडक आणि तातडीने कायदेशीर कार्यवाही करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
महाराष्ट्राचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्र्यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालून पीडित कुटुंबाला त्वरित न्याय मिळवून द्यावा, अशी अपेक्षा सर्वसामान्य जनतेकडून व्यक्त केली जात आहे.
माणगाव येथील अल्पवयीन स्वरा उपाध्ये खून प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून दोषींना फाशी द्या; राजू शेट्टी यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.
|