बातम्या
राजू शेट्टींनी मुख्यमंत्र्यांची घेतली भेट
By nisha patil - 10/20/2026 12:20:30 AM
Share This News:
राजू शेट्टींनी मुख्यमंत्र्यांची घेतली भेट
मुबलक पाणीसाठ्याअभावी लादलेली उपसाबंदी उठवून कोयनेचे ६७.५० टीएमसी पाणी शेती व पिण्यासाठी आरक्षित करण्याची आग्रही मागणी.
कोल्हापूर:(प्रतिनिधी) पश्चिम महाराष्ट्रातील गंभीर पाणीप्रश्न, तीव्र दुष्काळी परिस्थिती आणि धरणांमधील पाण्याचे चुकीचे नियोजन या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कोल्हापूर विमानतळावर तातडीची भेट घेतली. या भेटीत शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांना एक सविस्तर निवेदन सुपूर्द केले. यामध्ये त्यांनी कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील पाणी उपसाबंदी रद्द करण्याची, कालवा सल्लागार समितीची बैठक घेण्याची आणि मुख्य म्हणजे कोयना धरणातीलवीजनिर्मिती थांबवून ते पाणी शेतीसाठी वापरण्याची आग्रही मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी या सर्व मागण्या अत्यंत गांभीर्याने ऐकून घेत तातडीने सकारात्मक उपाययोजना करण्याचे सुतोवाच केले आहे.
कोयना धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता १०५.२५ टीएमसी (TMC) एवढी आहे. यापैकी उपयुक्त पाणीसाठा सुमारे ९४.७८ टीएमसी इतका आहे, तर उर्वरित पाणी मृत साठा म्हणून गणले जाते.कृष्णा पाणी वाटप लवादाच्या (KWDT) नियमांनुसार, कोयना धरणातून दरवर्षी वीजनिर्मितीसाठी अधिकृतपणे ६७.५० टीएमसी पाणी आरक्षित केले जाते. परंतु, दुर्दैवाने वीजनिर्मितीसाठी वापरले जाणारे हे संपूर्ण ६७.५० टीएमसी पाणी शेवटी पश्चिमेकडे वळवून समुद्राला जाऊन मिळते.वीजनिर्मितीचे ६७.५० टीएमसी पाणी वजा जाता, अवघे ४२.७ टीएमसी पाणी सांगली, सातारा या भागांतील सिंचन योजना आणि पिण्यासाठी उरते. यंदाच्या तीव्र दुष्काळी वर्षात पूर्वभागातील सिंचन योजना आणि पिण्याच्या पाण्यासाठी हा साठा अत्यंत अपुरा पडत आहे. ग्रामीण भागात दुष्काळाची दाहकता तीव्र असून शेतकरी आणि सर्वसामान्य जनता पाण्यासाठी होरपळून निघत आहे.
यंदाच्या दुष्काळाची भीषणता ओळखून कोयना धरणातील वीजनिर्मिती तातडीने थांबवण्यात यावी. वीजनिर्मितीसाठी सौर ऊर्जा किंवा ग्रीडमधील इतर वीज यांसारख्या पर्यायी ऊर्जा स्रोतांचा वापर करून विजेची टंचाई भरून काढता येईल. मात्र एकदा समुद्रात वाहून गेलेले पाणी आपण पुन्हा मिळवू शकत नाही, ही वस्तुस्थिती त्यांनी मांडली.वीजनिर्मितीचे ६७.५० टीएमसी पाणी पश्चिमेकडे समुद्रात न सोडता, ते पूर्वेकडे वळवून सांगली, सातारा आणि इतर टंचाईग्रस्त भागांतील सिंचन योजनांसाठी आणि पिण्यासाठी आरक्षित केले जावे. तसेच मुबलक पाणीसाठा उपलब्ध असलेल्या कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील धरणांवर अचानक लादलेली अन्यायकारक उपसाबंदी तातडीने रद्द करावी.
दुष्काळाने होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रशासनामार्फत उपलब्ध पाण्यात योग्य 'पीक नियोजन' करून द्यावे, जेणेकरून कमी पाण्यात येणारी आणि उभी पिके जगवता येतील. पाणी वाटपाचे धोरण निश्चित करण्यासाठी कालवा सल्लागार समितीची तातडीने बैठक बोलावण्यात यावी.
महाराष्ट्रातील बळीराजाला आणि जनतेला या महाभयंकर दुष्काळातून वाचवण्यासाठी या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंती राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांना केली. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत सकारात्मकता दर्शवली. धरणांमध्ये पाणी नियोजन करताना शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाईल आणि उपसाबंदी व कालवा समितीच्या बैठकीबाबत जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने पावले उचलण्याचे निर्देश दिले जातील, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.
राजू शेट्टींनी मुख्यमंत्र्यांची घेतली भेट
|