बातम्या

“कोल्हापूर-पुणे महामार्ग खड्डेमय; टोल बंद करण्यासाठी राजू शेट्टींची याचिका”

Raju Shettys petition to stop tolls


By nisha patil - 11/9/2025 1:29:50 PM
Share This News:



कोल्हापूर
        सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाप्रमाणे जे रस्ते निकृष्ठ व खराब  झाले असतील त्या रस्त्यावर टोल आकारणी करता येणार नसल्याने कोल्हापूर ते पुणे रस्त्याची दुरावस्था झाल्याने टोल आकारणी तातडीने बंद करावी अशी याचिका कोल्हापूर खंडपीठात मा. खासदार राजू यांनी दाखल केली. 

कोल्हापूर खंडपीठाने  याबाबत मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य  , रस्ते विकास प्राधिकरणाचे सचिव त्याबरोबरच कोल्हापूर , सांगली , सातारा व पुणे जिल्हाधिकारी यांना पुढील सुनावणीस हजर राहण्याबाबत  नोटीसा लागू करण्यात आल्या आहेत. 
              दोन आठवड्यापुर्वी केरळ राज्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या खराब रस्त्यांच्या दाखल झालेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश भुषण गवई  यांच्या त्रिसदस्यीय समितीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची याचिका फेटाळून फटकारले होते. या पार्श्वभुमीवर राजू शेट्टी यांनी कोल्हापूर ते पुणे हा रस्ता अत्यंत निकृष्ठ झालेला असून जोपर्यंत रस्त्याची कामे पुर्ण होत नाहीत तोपर्यंत टोल आकारणी न करण्याची मागणी खंडपीठात केली आहे. 
           सदर याचिकेमध्ये राजू शेट्टी यांनी राज्याचे मुख्यमंत्री , मुख्य सचिव , रस्ते विकास प्राधिकरणाचे सचिव त्याबरोबरच कोल्हापूर , सांगली , सातारा व पुणे जिल्हाधिकारी यांना प्रतिवादी केले आहे.कोल्हापूर ते पुणे या २४० किलोमीटरच्या महामार्गावर प्रवास करण्यासाठी ज्याठिकाणी ३ तासात पोहचणे अपेक्षित असताना सध्या ७ तास लागत आहेत. रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहनांचे नुकसान मोठ्या प्रमाणात होवू लागले आहे. पावसाळ्यात प्रवास करताना अनेक मोठे अपघात झाले असून वाहतूकदारांना प्रचंड मनस्ताप होवू लागला आहे. 
          कोल्हापूर खंडपीठाकडून मंगळवारी झालेल्या सुनावणी दरम्यान प्राधिकरणासह वरील सर्व विभागांना पुढील सुनावणीस हजर राहण्याबाबत नोटीसा लागू करण्यात आल्या आहेत. सध्या कोल्हापूर ते पुणे या महामार्गावर दैनंदिन दीड ते दोन कोटी रूपयांची टोल वसुली केली जात आहे मात्र वाहतूकदारांना  सुविधा कोणत्याच दिल्या जात नाहीत. सदर याचिकेच्या निर्णयामुळे  कोल्हापूर , सांगली , सातारा व पुणे या जिल्ह्यातील प्रवाशांना व वाहतूकदारांना दिलासा मिळणार असून या मार्गावर प्रवास करणा-यांच्या नजरा आता या याचिकेच्या निकालाकडे लागल्या आहेत.


“कोल्हापूर-पुणे महामार्ग खड्डेमय; टोल बंद करण्यासाठी राजू शेट्टींची याचिका”
Total Views: 92