बातम्या
कागलच्या राजवीर पोवारचा कुस्तीच्या आखाड्यात डंका!
By nisha patil - 10/24/2026 2:06:40 PM
Share This News:
कागलच्या राजवीर पोवारचा कुस्तीच्या आखाड्यात डंका!
राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई; दिल्लीतील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड
कागल : अहिल्यानगर येथे झालेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत कागलचा युवा पैलवान राजवीर सतीश पोवार याने दमदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. या दैदीप्यमान यशाच्या जोरावर त्याची दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली असून, तो राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राच्या कुस्ती संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. राजवीरच्या या यशामुळे कागलच्या कुस्ती क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
राजवीर हा कंदलगाव येथील जागतिक कुस्ती आखाड्यात नियमित सराव करतो. त्याला एनआयएस प्रशिक्षक गौरव पाटील सर, एनआयएस प्रशिक्षक सागर देसाई सर आणि वस्ताद मारुती पोवार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे. प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली घेतलेली मेहनत, जिद्द आणि कुस्तीवरील निष्ठेच्या जोरावर त्याने राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली.
राजवीरची दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल कागल येथील पैलवान गणपत आखाड्यात जल्लोष करण्यात आला. यावेळी राजवीरचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून त्याच्या यशाचे कौतुक करण्यात आले.
या सत्कार सोहळ्यास के.डी.सी. बँकेचे संचालक भैय्यासाहेब माने, महाराष्ट्र केसरी पैलवान विष्णू जोशीलकर तात्या, बिद्री साखर कारखान्याचे संचालक, आशियाई सुवर्णपदक विजेते, ऑल इंडिया रेल्वे चॅम्पियन व उपमहाराष्ट्र केसरी पैलवान रवींद्र पाटील, विकास पाटील, नितीन दिंडे, सतीश घाटगे, वस्ताद मारुती पोवार, राजवीरचे प्रशिक्षक गौरव पाटील यांच्यासह मित्रपरिवार व अन्य मान्यवर उपस्थित होते.
राजवीरच्या या यशामुळे कागलच्या कुस्ती परंपरेला आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. आता दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेतही त्याने उत्कृष्ट कामगिरी करून महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवावा, अशा शुभेच्छा उपस्थित मान्यवरांनी दिल्या. राजवीरच्या पुढील कुस्ती कारकिर्दीसाठी सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कागलच्या राजवीर पोवारचा कुस्तीच्या आखाड्यात डंका!
|