शैक्षणिक
संविधान दिनानिमित्त रॅलीचे आयोजन
By nisha patil - 11/26/2025 11:24:57 AM
Share This News:
कोल्हापूर, दि. 25 (जिमाका) : भारतीय संविधानास 75 वर्षे पूर्ण झाल्याने अमृत महोत्सवी वर्षानिमित्त घर घर संविधान या कार्यक्रमांतर्गत दिनांक 26 नोव्हेंबर 2025 ते 26 जानेवारी 2026 या कालावधीत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन साळे यांनी दिली आहे.
भारतीय संविधानाविषयी जनमाणसांमध्ये जनजागृती करण्यासाठी घर घर संविधान या कार्यक्रमाची सुरुवात दिनांक 26 नोव्हेंबर 2025 पासून होत असून दिनांक 26 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 9.30 वाजता ऐतिहासिक बिंदू चौक येथून या संविधान रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीमध्ये जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन. एस., पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, महानगरपालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी व सहायक आयुकत समाज कल्याण सचिन साळे यांची प्रमुख उपस्थित राहणार आहे.
जिल्ह्यातील विविध महाविद्यालय शासकीय आस्थापना, जिल्ह्यातील नागरिक यांच्या समवेत भारतीय संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात येणार असून ऐतिहासिक बिंदू चौकापासून दसरा चौकापर्यंत संविधान रॅलीचे नियोजन करण्यात आले आहे. संविधान रॅली ऐतिहासिक बिंदू चौक येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले या महामानवांना अभिवादन करुन पुढे छत्रपती शिवाजी महाराज - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महानगरपालिका परिसर पुढे गंगाराम कांबळे स्मृतीस्थळ सीपीआर मार्गे दसरा चौक येथील राजश्री छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन करुन दसरा चौक या ठिकाणी संविधान रॅलीची सांगता होणार आहे.
तरी जिल्ह्यातील महाविद्यालय व नागरिकांनी मोठ्या प्रमाणामध्ये या संविधान रॅलीत सहभागी व्हावे, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त श्री. साळे, यांनी केले आहे.
संविधान दिनानिमित्त रॅलीचे आयोजन
|