ताज्या बातम्या

राम मंदिर पूर्ण; आज मोदींच्या हस्ते ११ किलो वजनाच्या विशेष भगव्या ध्वजाचे ध्वजारोहण

Ram temple completed


By nisha patil - 11/25/2025 11:48:42 AM
Share This News:



अयोध्या : भव्य आणि दिव्य अशा अयोध्येतील राम मंदिराचे बांधकाम प्राणप्रतिष्ठेनंतर तब्बल एक वर्ष नऊ महिन्यांनी पूर्णत्वास आले आहे. या महत्त्वपूर्ण क्षणाचे औचित्य साधत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिरावरील भगवा ध्वज फडकवला जाणार आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह देशभरातील जवळपास आठ हजार विशेष पाहुणे या ऐतिहासिक ध्वजारोहण सोहळ्याचे साक्षीदार ठरणार आहेत.

१२ ते १२:३० या शुभ मुहूर्तावर फडकवला जाणारा हा ध्वज ११ किलो वजनाचा असून, विशेष पॅराशूट फॅब्रिकपासून तयार करण्यात आला आहे. ध्वजावर सूर्य, ‘ॐ’ आणि अयोध्येचे राजवृक्ष—कोविदार वृक्ष यांची प्रतीके अत्यंत नक्षीदार पद्धतीने अंकित आहेत. हा भगवा २२ फूट लांब, ११ फूट रुंद असून, तो ४२ फूट उंचीच्या स्तंभावर फडकवला जाणार आहे.

मंदिरावर ध्वज फडकवणे म्हणजे मंदिराचे संपूर्ण बांधकाम पूर्ण झाल्याची अधिकृत घोषणा असा अर्थ या विधीला आहे. या निमित्ताने भाजपने ‘घर-घर राम’ अभियान राबवले असून, प्रत्येक घरावर भगवा ध्वज फडकवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या सोहळ्याचा जल्लोष आणि उत्साह महाराष्ट्रासह देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होताना दिसत आहे.


राम मंदिर पूर्ण; आज मोदींच्या हस्ते ११ किलो वजनाच्या विशेष भगव्या ध्वजाचे ध्वजारोहण
Total Views: 45