बातम्या

अच्युत गोडबोले यांच्या हस्ते "रंजन गुजन"चे प्रकाशन — 

Ranjan Gujan released by Achyut Godbole


By nisha patil - 11/6/2025 2:56:02 PM
Share This News:



अच्युत गोडबोले यांच्या हस्ते "रंजन गुजन"चे प्रकाशन — 

 रंजनाकुमारी सुतार यांच्या आठवणींना शब्दबद्ध करणारे पुस्तक वाचनात : वसंत कुमार सुतार

 एका पत्नीने दिलेल्या अविरत साथीस, सहनशक्तीस आणि निःस्वार्थ प्रेमाला शब्दबद्ध करणारे, प्रेमापोटी, श्रद्धेपोटी आणि आदरापोटी लिहिलेले आत्मकथनात्मक पुस्तक — "रंजन गुजन" — लवकरच कोल्हापुरात प्रकाशीत होणार आहे. या हृदयस्पर्शी पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शुक्रवार, दिनांक 13 जून 2025 रोजी सकाळी 11.00 वाजता, श्री प्रिन्स शिवाजी मराठा अँडोटेरियम हॉल, न्यू कॉलेज, शिवाजी पेठ, कोल्हापूर येथे संपन्न होणार आहे.

या विशेष प्रसंगी उपस्थित राहणार आहेत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संगणकतज्ञ, लेखक आणि विज्ञानविषयक विचारांचे प्रभावी सादरकर्ते मा. श्री. अच्युत गोडबोले. त्यांनीच "रंजन गुजन" या पुस्तकाचे प्रकाशन आपल्या शुभ हस्ते करणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. डॉ. व्ही.एम. पाटील असून प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. पराग पोतदार आणि मा. सौ. गीता रूप चरणीं (प्राचार्य, न्यू कॉलेज, कोल्हापूर) यांची उपस्थिती लाभणार आहे.

या पुस्तकाचे लेखक श्री. वसंत रामचंद्र सुतार हे न्यू कॉलेजचे माजी विद्यार्थी असून त्यांनी हे पुस्तक आपल्या पत्नी रंजनाकुमारी सुतार यांच्या जीवनावर प्रेमाने, कृतज्ञतेने आणि आठवणींच्या गहिऱ्या भावनांनी लिहिले आहे. आयुष्यभर दिलेल्या साथीस आणि सुखदुःखाच्या प्रवासात तिच्या निस्वार्थ योगदानासाठी हे पुस्तक एक समर्पण आहे. हे केवळ आत्मकथन नसून ती एका स्त्रीच्या संघर्षाची आणि धीरगंभीर सहवासाची नोंद आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन न्यू कॉलेज, कोल्हापूर आणि सौ. व श्री. वसंत रामचंद्र सुतार (माजी विद्यार्थी) यांनी संयुक्तपणे केले आहे. प्रकाशनासाठी ओशनवेव्हज् पब्लिकेशन, पुणे हे प्रकाशक असून, सहसंयोजनात इनर व्हिल हेरीटेज क्लब, कोल्हापूर या संस्थेचा सहभाग आहे.

या प्रसंगी श्री. वसंत रामचंद्र सुतार यांनी लिहिलेली त्यांच्या आधीच्या वाचनीय पुस्तकांचीही प्रदर्शनी ठेवण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या निमित्ताने कोल्हापूर परिसरातील साहित्य, शिक्षण, विज्ञान आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती अपेक्षित आहे.


अच्युत गोडबोले यांच्या हस्ते "रंजन गुजन"चे प्रकाशन — 
Total Views: 135