ताज्या बातम्या
रंकाळा तलाव पुन्हा जलपर्णीच्या विळख्यात; सांडपाण्यामुळे प्रदूषणाचा वाढता धोका
By nisha patil - 10/30/2025 11:02:01 AM
Share This News:
कोल्हापूर:- कोल्हापुरातील प्रमुख पर्यटन आकर्षण असलेल्या रंकाळा तलावाचे सौंदर्य पुन्हा एकदा जलपर्णीच्या विळख्यात अडकू लागले आहे. तांबट कमानीपासून ते राजघाटाच्या पायऱ्यांपर्यंत ठिकठिकाणी जलपर्णीचे पुंजके दिसू लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून हजारो लिटर सांडपाणी थेट तलावात मिसळत असल्याने, जलपर्णीची वाढ झपाट्याने होत असून रंकाळ्यासाठी ही धोक्याची घंटा ठरत आहे.
रंकाळ्यातील पाण्यात प्रदूषण वाढल्याने जलपर्णीची वाढ अधिक वेगाने होत आहे. सांडपाण्यावर महापालिकेचा अंकुश नसल्याने, तलावात पोषणद्रव्यांचे प्रमाण वाढले असून ते जलपर्णीच्या वाढीस पोषक ठरत आहे. यामुळे तलावातील पाण्याची गुणवत्ता खालावत असून परिसरात दुर्गंधी पसरत आहे.
स्थानिक नागरिक आणि ‘रंकाळा प्रेमी’ संघटना यांनी याबाबत महापालिकेकडे तातडीने जलपर्णी निर्मूलन मोहीम सुरू करण्याची मागणी केली आहे. सध्या जलपर्णीचे प्रमाण कमी असले तरी वाढीचा वेग पाहता लवकर कारवाई न झाल्यास संपूर्ण तलाव आच्छादित होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
१० ते १२ वर्षांपूर्वी रंकाळा तलावावर याच प्रकारे जलपर्णीचे संपूर्ण आच्छादन झाले होते, ज्यामुळे तलाव मैदानासारखा दिसू लागला होता. त्या भीषण प्रसंगानंतर पुन्हा एकदा जलपर्णीचा शिरकाव झाल्याने नागरिकांमध्ये आरोग्य आणि पर्यावरणाबाबत चिंता वाढली आहे.
तज्ज्ञांच्या मते, जलपर्णी ही सांडपाणी आणि नायट्रोजनयुक्त प्रदूषणामुळे झपाट्याने वाढणारी वनस्पती आहे. जर तातडीने उपाययोजना केल्या नाहीत, तर रंकाळ्याचे पर्यावरणीय संतुलन आणि पर्यटनाचे आकर्षण दोन्ही धोक्यात येऊ शकते.
रंकाळा तलाव पुन्हा जलपर्णीच्या विळख्यात; सांडपाण्यामुळे प्रदूषणाचा वाढता धोका
|