आरोग्य

“कोल्हापुरात दुर्मीळ शस्त्रक्रिया यशस्वी : जबडा काढून पायाच्या हाडाने चेहरा पूर्ववत”

Rare surgery successful in Kolhapur


By nisha patil - 10/9/2025 12:31:30 PM
Share This News:



“कोल्हापुरात दुर्मीळ शस्त्रक्रिया यशस्वी : जबडा काढून पायाच्या हाडाने चेहरा पूर्ववत”

कोल्हापूर : राधानगरी तालुक्यातील धामोड येथील २५ वर्षीय दैवता तिबिले या महिलेवर छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयात दुर्मीळ शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या करण्यात आली. कॅन्सरसदृश गाठेमुळे जबडा पूर्णपणे काढून टाकावा लागला आणि त्याठिकाणी पायाचे हाड बसवून चेहऱ्याला पुन्हा मूळ स्वरूप देण्यात आले.

दंतशल्यचिकित्साशास्त्र विभागात ही अशा प्रकारची पहिलीच शस्त्रक्रिया मानली जात आहे. रुग्ण दैवता तिबिले यांना यापूर्वीही गाठीसाठी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र गाठ पुन्हा वाढल्याने त्या २१ ऑगस्ट रोजी रुग्णालयात दाखल झाल्या. २३ ऑगस्ट रोजी तब्बल १२ तास चाललेल्या मायक्रोव्हॅस्क्युलर शस्त्रक्रियेत जबडा काढून पायाच्या हाडाला जबड्याचे स्वरूप देण्यात आले. त्याचबरोबर रक्तपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी नसेला नस जोडण्याची प्रक्रिया करण्यात आली.

खासगी रुग्णालयात या शस्त्रक्रियेसाठी तब्बल सहा लाख रुपयांचा खर्च सांगण्यात आला होता. मात्र छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयात महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत रुग्णाला मोफत उपचार मिळाले.

या शस्त्रक्रियेत डॉ. अमोल लाहोटी, डॉ. गायत्री कुलकर्णी, डॉ. प्रियांका सावडकर, डॉ. नितीन जैसवाल, डॉ. प्राची पन्हाळे यांच्यासह प्लास्टिक सर्जन डॉ. प्रशांत चौधरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. भूलतज्ज्ञ, अधिष्ठाता व विविध विभागातील डॉक्टरांचेही मोलाचे सहकार्य लाभले.

या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे दैवता तिबिले यांना पुन्हा नवे आयुष्य मिळाले आहे.


“कोल्हापुरात दुर्मीळ शस्त्रक्रिया यशस्वी : जबडा काढून पायाच्या हाडाने चेहरा पूर्ववत”
Total Views: 92