बातम्या

राशिवडे बुद्रुक जिल्हा परिषद मतदारसंघ प्रचार सभा

Rashivade Budruk Zilla Parishad Constituency Campaign Meeting


By Administrator - 1/27/2026 5:44:00 PM
Share This News:



राशिवडे बुद्रुक जिल्हा परिषद मतदारसंघ प्रचार सभा
          
विनय पाटील हा जनतेसाठी अहोरात्र धडपडणारा हाडाचा कार्यकर्ता आहे
             
मंत्री हसन मुश्रीफ यांचे गौरवोद्गार 
        
राशिवडे बुद्रुक जिल्हा परिषद मतदार संघाच्या जाहीर प्रचारसभेला जोरदार प्रतिसाद

             
राशिवडे बुद्रुक, दि. २७: राशिवडे बुद्रुक जिल्हा परिषद मतदार संघातील उमेदवार विनय राजेंद्र पाटील हा जनतेसाठी अहोरात्र धडपडणारा एक हाडाचा आणि सच्चा कार्यकर्ता आहे. जनतेच्या प्रश्नासाठी आणि विकासकामांसाठी निरंतर पाठपुरावा करण्याचे त्याचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत.

असा हाडाचा कार्यकर्ता उच्चांकी मतांनी निवडून जिल्हा परिषदेत पाठवा. त्याला चांगली संधी दिल्याशिवाय राहणार नाही, अशी हमी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. वाघवडेसारख्या छोट्या गावातून राशिवडे पंचायत समिती मतदार संघाची उमेदवारी करीत असलेल्या सौ. रुपाली संतोष पाटील यांना आपली मुलगी, बहीण मानून ओट्यात घ्या. मी व जिल्हा बँक धामोड पंचायत समिती मतदार संघाचे उमेदवार जयसिंग खामकर यांच्या जॅगरी उद्योगाच्या पाठीशी आहोत. त्यामुळे डोंगराळ भागातही रोजगार निर्मिती होईल, असेही ती पुढे म्हणाले.
         
राशिवडे बुद्रुक जिल्हा परिषद मतदार संघातील उमेदवार विनय पाटील, राशिवडे बुद्रुक पंचायत समिती मतदार संघाच्या उमेदवार सौ. रुपाली संतोष पाटील, धामोड पंचायत समिती मतदार संघाचे उमेदवार जयसिंग हिंदुराव खामकर यांच्या प्रचारार्थ घोटवडे ता. राधानगरी येथे आयोजित जाहीर प्रचार सभेत मंत्री श्री. मुश्रीफ बोलत होते.
          
मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, लोकप्रतिनिधी या नात्याने गरीब, सामान्य, दिनदलित, पददलित, युवक, बेरोजगार यांच्या सुखदुःखात मिसळून काम करण्याची विनय पाटील यांची पद्धत आहे. आमचे सर्वच उमेदवार गोरगरिबांच्या कल्याणाच्या कार्यात अग्रभागी राहतील. जिल्हा परिषद व माझ्या शासकीय निधीच्या माध्यमातून राशिवडे बुद्रुक जिल्हा परिषद मतदार संघाच्या विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही. येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यासाठी निधी मिळवून देण्यासाठी तर प्रयत्न करूच. परंतु; तो मिळाला नाही किंवा कमी पडला तर माझ्या फाउंडेशनच्या माध्यमातून पुतळ्याची उभारणी करू, असेही ते म्हणाले.
        
माजी आमदार के. पी. पाटील म्हणाले, विनय पाटील हे वयाने लहान परंतु प्रचंड समज असलेले उमेदवार आहेत. राशिवडे बुद्रुक हे स्वातंत्र्यसंग्रामाच्या चळवळीचे केंद्र होते. तसेच;  भोगावती साखर कारखान्यच्या स्थापनेमध्येही हे गाव अग्रभागी होते. या गावाला वैचारिक अधिष्ठान आहे. विनय पाटील यांच्यासारख्या समजदार उमेदवाराच्या पाठीशी हे गाव एक दिलाने ऊभे राहील. 
          
लोकगंगेला आला महापूर......! 
मुश्रीफ म्हणाले,  आजवर मी भोगावतीला, पंचगंगेला आलेला महापूर बघितला होता. वेदगंगेला व  दूध गंगेला आलेली महापौर बघितले आहेत. परंतु; विनय पाटील यांच्यासारख्या हाडाच्या कार्यकर्त्याला प्रचंड मतांनी निवडून आणण्यासाठी  हा लोकगंगेला महापूर आलेला आहे. यावरून सिद्ध होते की, विनय पाटील यांच्यासह या उमेदवारांचे प्रचंड मताधिक्यांचे विजय निश्चित आहेत. जिल्हा परिषदेवर महायुतीचा झेंडा फडकणार आहे. दरम्यान; जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादीचा अध्यक्ष होणार आहे. मी विनय पाटील यांना चांगली संधी दिल्याशिवाय राहणार नाही.
            

आयुष्यभर ऋणात राहीन......! 
जिल्हा परिषद उमेदवार विनय पाटील म्हणाले, जनतेची निरंतर सेवा करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्यत्वाची ही संधी द्या. आयुष्याचा क्षण आणि क्षण तुमच्यासाठी वेचेन. जनतेच्या हिताचे आणि कल्याणाचे चांगले काम करीन. संपूर्ण आयुष्यभर तुमच्या ऋणात राहीन.
          
यावेळी व्यासपीठावर माजी आमदार के. पी. पाटील, गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष अरुणराव डोंगळे, राधानगरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष किसनराव चौगुले, सर्जेराव पाटील- गवशीकर, धैर्यशील पाटील कौलवकर, महिपती पिसाळ, रणजीतसिंह पाटील, नानासाहेब पाटील, विश्वास पाटील, धनाजी पाटील, अशोक चौगुले, बाजीराव पाटील, बापूसाहेब पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.


राशिवडे बुद्रुक जिल्हा परिषद मतदारसंघ प्रचार सभा
Total Views: 21