बातम्या
राऊतवाडी धबधबा प्रवाहित; पावसाळी पर्यटनाला वेग
By Administrator - 6/7/2026 1:32:28 PM
Share This News:
राऊतवाडी धबधबा प्रवाहित; पावसाळी पर्यटनाला वेग
तारा न्यूज प्रतिनिधी अजित बोडके राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रासह तालुक्याच्या पश्चिम भागात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे राधानगरी तालुक्यातील प्रसिद्ध राऊतवाडी धबधबा अखेर प्रवाहित झाला आहे. धबधबा प्रवाहित झाल्याने पावसाळी पर्यटनाला वेग आला असून जिल्ह्यासह परिसरातील निसर्गप्रेमी आणि पर्यटकांची पावले आता राऊतवाडीकडे वळू लागली आहेत.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने संपूर्ण परिसर हिरवाईने नटला आहे. डोंगररांगांवर पसरलेली धुक्याची दुलई, फेसाळत कोसळणारा राऊतवाडी धबधबा आणि निसर्गरम्य वातावरणामुळे परिसराचे सौंदर्य अधिकच खुलून आले आहे. यामुळे पर्यटकांना मनमोहक निसर्गाचा आनंद लुटण्याची पर्वणी मिळत आहे.
राधानगरी तालुक्यातील कपिलेश्वर येथील भैरी धबधब्यासह अनेक लहान-मोठे धबधबेही प्रवाहित होत असून राधानगरी, दाजीपूर अभयारण्य आणि राऊतवाडी परिसरात पावसाळी पर्यटनाला चालना मिळत आहे. येत्या काही दिवसांत पर्यटकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, धबधब्याचा आनंद घेताना पर्यटकांनी पाण्याच्या प्रवाहाजवळ जाणे टाळावे, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहन स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
राऊतवाडी धबधबा प्रवाहित; पावसाळी पर्यटनाला वेग
|