बातम्या
जिल्ह्यातील शेवटच्या घटकातील दिव्यांगांपर्यंत पोहोचा – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर
By nisha patil - 9/27/2025 3:05:23 PM
Share This News:
जिल्ह्यातील शेवटच्या घटकातील दिव्यांगांपर्यंत पोहोचा – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर
कोल्हापूरात प्रधानमंत्री दिव्याशा केंद्राचे उद्घाटन, दिव्यांग आणि ज्येष्ठांना साहित्याचे आता सुलभ वितरण
कोल्हापूर, दि. 27: केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व दिव्यांग सक्षमीकरण मंत्रालयांतर्गत राज्यातील सहावे प्रधानमंत्री दिव्याशा केंद्र कोल्हापूरात सुरू झाले असून, हे केंद्र दिव्यांगांसाठी महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त ठरेल. जिल्ह्यातील शेवटच्या घटकातील प्रत्येक दिव्यांगापर्यंत पोहोचून त्यांना योजनेचे लाभ मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न करा, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.
प्रधानमंत्री दिव्याशा केंद्राचे उद्घाटन पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार शाहू महाराज छत्रपती आणि खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते मध्यवर्ती शासकीय इमारत, कसबा बावडा येथे पार पडले. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात उपस्थित दिव्यांगांना साहित्याचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व दिव्यांग सक्षमीकरण मंत्रालयांतर्गत मंजूर झालेले हे केंद्र पालकमंत्री आबिटकर यांच्या विशेष प्रयत्नांमुळे कोल्हापूर जिल्ह्यासाठी मंजूर झाले आहे. उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, उपसंचालक आरोग्य डॉ. दिलीप माने, दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी साधना कांबळे, अलिम्कोचे के. डी. गोटे आणि समन्वयक अमेय जोशी उपस्थित होते.
पालकमंत्री आबिटकर म्हणाले, या केंद्राच्या माध्यमातून चांगले काम करून हा उपक्रम राज्यातील सर्वात प्रभावी ठरावा. त्यांनी नवजात बालकांमधील अपंगत्वावर मात करण्यासाठी कायद्याच्या चौकटीत राहून गरोदर मातांच्या आवश्यक तपासण्या करण्यासाठी मोहीम स्वरूपात काम करण्याच्या सूचना आरोग्य विभागाला दिल्या. यासाठी प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रातील यंत्रणा अधिक सुदृढ करावी. तसेच, जिल्हा परिषदेने या केंद्रातून दिल्या जाणाऱ्या सेवांसाठी प्रभावी नियोजन करावे, असेही ते म्हणाले.
प्रधानमंत्री दिव्याशा केंद्र हा भारत सरकारचा महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध होणार आहेत. या केंद्राद्वारे अनेक महत्त्वपूर्ण सेवा पुरवल्या जाणार आहेत, ज्यामध्ये पुनर्वसन सेवा, साहाय्यक साधनांचे वितरण यांचा समावेश आहे. यात व्हीलचेअर्स, श्रवणयंत्रे, कृत्रिम अवयव, दृष्टीसाठी साधने, बॅटरीद्वारे चालणारी तिपहिया सायकल, कमोड चेअर, सी.पी. चेअर, कंबरेचा पट्टा, नेक बँड, वॉकिंग स्टिक यांचा समावेश आहे.
महाराष्ट्रातील मुंबई, अहमदनगर, नागपूर, बुलढाणा आणि लातूर येथील केंद्रांनंतर कोल्हापूर हे सहावे पीएमडीके केंद्र ठरले आहे. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या गरजेनुसार उपचार आणि सहाय्यक सुविधा उपलब्ध होऊन त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडतील. पुर्वी कॅम्पमधून साहित्य वाटप होत असे आता या केंद्रातून दैनंदिन स्वरुपात आवश्यक साहित्याचे वाटप दिव्यांगांना केले जाणार आहे.
अपंगत्व होऊच नये यासाठी प्रयत्न करा – खासदार शाहू महाराज छत्रपती
समाजात अनेक कारणांमुळे लोकांना अपंगत्व येते. यामध्ये आपण ते टाळण्यासाठी काय करता येईल, हे पाहावे. ज्याप्रकारे आपण क्षयरोग (टीबी) नाहीसा केला, त्याचप्रमाणे अपंगत्वावरही मात करूया. प्रधानमंत्री दिव्याशा केंद्रातून जास्तीत जास्त लोकांना लाभ मिळेल, असेही ते म्हणाले.
प्रधानमंत्री दिव्याशा केंद्र दिव्यांग-ज्येष्ठांना आधार – खासदार धैर्यशील माने
केंद्र शासनाच्या माध्यमातून संपूर्ण देशात दिव्यांग आणि ज्येष्ठांना बळ देण्याचे काम सुरू आहे. या स्तुत्य उपक्रमातून योग्य व्यक्तींना लाभ देण्यात यावा, असे त्यांनी सांगितले. शासनाने गरजूंसाठी दिलेल्या या आधाराचा योग्य वापर करूया, असे आवाहनही त्यांनी केले. तसेच, दिव्यांग साहित्यामध्ये सायकलचा वापर हाताने न करता, त्यासाठी आवश्यक बॅटरीद्वारे चालणाऱ्या साहित्यासाठी सीएसआरमधून निधी उपलब्ध करू, असेही त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील शेवटच्या घटकातील दिव्यांगांपर्यंत पोहोचा – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर
|