बातम्या

व्यंकटराव शिक्षण संकुलात वाचन प्रेरणा दिन व जागतिक हात धुवा दिन उत्साहात साजरा

Reading Inspiration Dayand Global Handwashing Day


By nisha patil - 10/15/2026 11:21:36 PM
Share This News:



व्यंकटराव शिक्षण संकुलात वाचन प्रेरणा दिन व जागतिक हात धुवा दिन उत्साहात साजरा
 

*आजरा(हसन तकीलदार): आजरा महाल शिक्षण मंडळ, आजरा संचलित व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आजरा येथे भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन व जागतिक हात धुवा दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.
 

कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रशालेचे प्राचार्य संजयकुमार पाटील व पर्यवेक्षिका व्ही. जे. शेलार यांच्या हस्ते डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी सहाय्यक शिक्षक आर. पी. होरटे यांनी 'वाचनाचे महत्त्व' या विषयावर विचार मांडताना विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात वाचनाचे अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे सांगितले. नियमित वाचनामुळे ज्ञानात भर पडते, विचारांना चालना मिळते आणि जीवनाला योग्य दिशा मिळते, असे प्रतिपादन त्यांनी केले. डी. आर. पाटील यांनीही याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले.

 

वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून इयत्ता नववीतील विद्यार्थिनी कु. अनुष्का हरेर हिने प्रशालेला पुस्तक भेट देऊन वाचन संस्कृती जोपासण्याचा प्रेरणादायी संदेश दिला. कु. कादंबरी धुरी व कु. अफिया भडगावकर यांनी डॉ. कलाम यांचे जीवनकार्य व वाचनाचे महत्त्व याविषयी भाषणे सादर केली. प्रशालेचे ग्रंथपाल टी. एम. गुरव यांनी विविध पुस्तकांचे आकर्षक प्रदर्शन भरवून विद्यार्थ्यांना वाचनासाठी प्रोत्साहित केले.
 

जागतिक हात धुवा दिनानिमित्त इयत्ता सहावी 'ब'च्या विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणारी प्रबोधनपर लघुनाटिका सादर केली. तसेच योग्य पद्धतीने हात धुण्याचे प्रात्यक्षिक दाखवून वैयक्तिक स्वच्छता व आरोग्य संवर्धनाचा संदेश दिला. या उपक्रमासाठी सौ. ए. डी. पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे नेटके नियोजन इयत्ता नववी 'क'च्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी वर्गशिक्षिका श्रीमती एस. टी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केले. कु. तनया मिसाळ व कु. वेदिका खोराटे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर यशराज पोतदार याने आभार मानले.

 

या कार्यक्रमास प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाचन संस्कृतीची जोपासना आणि स्वच्छतेविषयी जनजागृती अशा दुहेरी उद्देशाने आयोजित केलेला हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.


व्यंकटराव शिक्षण संकुलात वाचन प्रेरणा दिन व जागतिक हात धुवा दिन उत्साहात साजरा
Total Views: 6