शैक्षणिक
वाचनाने जीवनविषयक अनुभवांचा परीघविस्तार: विमल मोरे
By nisha patil - 10/16/2025 10:48:05 AM
Share This News:
कोल्हापूर, दि. १५ ऑक्टोबर: वाचन आपल्या जीवनविषयक आणि पर्यायाने साहित्यविषयक अनुभवांचा परीघ रुंदावणारे असते, असे मत प्रसिद्ध लेखिका विमल मोरे यांनी आज व्यक्त केले.
शिवाजी विद्यापीठाच्या मराठी अधिविभागाच्या वतीने माजी राष्ट्रपती भारतरत्न एपी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. मराठी विभागाचे प्रमुख डॉ. रणधीर शिंदे अध्यक्षस्थानी होते.
विमल मोरे यांनी आपल्या मनोगतातून आपले जीवनविषयक अनुभव आणि साहित्यनिर्मितीची प्रक्रिया उलगडून दाखवली. कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. संविधानातील मूलभूत अधिकार आणि कर्तव्ये याविषयी या निमित्ताने चर्चा झाली. त्याचप्रमाणे मराठी आणि हिंदी भाषेतील कुसुमाग्रज, सतीश काळसेकर, सफदर हाशमी, किशोर कदम, दासू वैद्य यासारख्या महत्वाच्या लेखकांच्या निवडक कविता आणि गद्य साहित्यकृतीमधील महत्वाच्या अंशांचे वाचन करण्यात आले. वाचन आणि त्यातून निर्माण होणारी साहित्य आणि जीवनविषयक प्रगाढ आस्था हे या सर्व कवितांमधले महत्त्वाचे सूत्र होते. या कार्यक्रमाला लेखक धनाजी माळी यांची विशेष उपस्थिती होती. याप्रसंगी विभागातील स्मिता राजमाने, कविता ननवरे, ज्योती वराळे, अनुराधा पाटील, सुखदेव एकल, मंदार पाटील, राजेश मोरे, गौरी कुंभार, दत्ता बिरुनगी, करुणा उकिरडे, विष्णू पावले, रुपाली पाटील यांनी पुस्तकांविषयीच्या निवडक कवितांचे वाचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रांजली क्षीरसागर यांनी केले तर श्रीराम मोहिते यांनी आभार मानले.
वाचनाने जीवनविषयक अनुभवांचा परीघविस्तार: विमल मोरे
|