बातम्या
वर्षभरातील समाजोपयोगी उपक्रमांची दखल : रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनला तब्बल १५ पुरस्कार
By nisha patil - 4/2/2026 6:40:38 PM
Share This News:
कोल्हापूर :- समाजातील विविध गरजू घटकांसाठी सातत्याने भरीव आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणाऱ्या रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनला २०२४–२५ या रोटरी वर्षात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत तब्बल १५ प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. ही माहिती रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या माजी अध्यक्षा सौ. अरुंधती धनंजय महाडिक यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
११ जुलै २०२४ रोजी रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या अध्यक्षपदी सौ. अरुंधती महाडिक यांची निवड झाली. त्यांच्या अध्यक्षीय कार्यकाळात क्लबने शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य, पर्यावरण आणि महिला सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रांत अत्यंत नियोजनबद्ध आणि व्यापक स्वरूपाचे उपक्रम राबवले.
विविध क्षेत्रांत उल्लेखनीय उपक्रम
या कालावधीत विकासवाडी व फाईव्ह स्टार एमआयडीसी परिसरात वृक्षारोपण, प्रथमच आषाढी वारीनिमित्त भाविकांसाठी अन्न व प्रसाद वाटप, कारगिल विजय दिनानिमित्त शहीद सैनिकांच्या कुटुंबियांचा सन्मान, बुद्धिबळ स्पर्धा, कळंबा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांसाठी रक्षाबंधन कार्यक्रम, स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताक दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिक व वृद्धाश्रमातील निराधारांसाठी आरोग्य तपासणी शिबिरे, सांस्कृतिक कार्यक्रम व गायन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
यासह जिल्ह्यातील नवोदित छायाचित्रकारांसाठी तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा, “कळी उमलताना” या कार्यक्रमांतर्गत किशोरवयीन मुलींसाठी आरोग्य व मार्गदर्शन शिबिरे (१५ हून अधिक शाळांमध्ये), विद्यार्थिनींसाठी सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशिनचे वितरण करण्यात आले.
विद्यार्थ्यांसाठी आणि युवकांसाठी विशेष उपक्रम
केटीएस स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून जिल्ह्यातील सुमारे १६०० विद्यार्थ्यांचा सहभाग, त्यातील २०० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, तसेच ६० गुणवंत विद्यार्थ्यांना टॅबचे वितरण करण्यात आले. आंतरशालेय वकृत्व स्पर्धा, महिला संघासह क्रिकेट (विकेट) स्पर्धा, शिक्षक दिनानिमित्त गुणवंत शिक्षकांचा सत्कारही करण्यात आला.
आरोग्य, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक बांधिलकी
महिलांमधील स्तनकर्करोगाचे प्रमाण कमी करण्यासाठी मॅमोग्राफी तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले. तसेच रोटरी ग्लोबल ग्रँटअंतर्गत कोल्हापूर कॅन्सर सेंटरला मॅमोग्राफी मशिन प्रदान करण्यात आले. निगवे खालसा येथे वॉटर एटीएम, दिव्यांगांसाठी व्हीलचेअर, सायकल, जयपूर फुटचे वितरण, १०० गरजू महिलांना मोफत शिलाई मशिन, असंडोली गावात मुलींसाठी शौचालय बांधकामासाठी मदत, तंटामुक्तीसाठी ‘प्रयास’ उपक्रमांतर्गत तंटामुक्ती केंद्राची स्थापना असे अनेक उपक्रम राबवण्यात आले.
मोठ्या प्रमाणावर निधी उभारणी
या सर्व उपक्रमांसाठी रोटरी इंटरनॅशनलच्या ग्लोबल ग्रँट अंतर्गत १ कोटी १३ लाख रुपयांचा निधी उभारण्यात क्लबला यश आले. खासदार धनंजय महाडिक, डॉ. रेश्मा व डॉ. सुरज पवार, पृथ्वीराज महाडिक, भारती व करुणाकर नायक यांच्या सहकार्यामुळे हे शक्य झाल्याचे सौ. महाडिक यांनी नमूद केले.
१५ पुरस्कारांनी गौरव
या सर्व कार्याची दखल घेत रोटरी मिडटाऊनला
बेस्ट प्रेसिडेंट
हायएस्ट कॉन्ट्रिब्युशन
बेस्ट अर्बन-रूरल रिलेशन
बेस्ट मेंबरशिप रिटेन्शन
आऊटस्टँडिंग कम्युनिटी सर्व्हिस प्रोजेक्ट
बेस्ट युथ सर्व्हिस
४ मेजर डोनर अवॉर्ड
२ ग्लोबल ग्रँट प्रोजेक्ट अवॉर्ड
‘द मॅजिक ऑफ रोटरी फाउंडेशन’ लेगसी अवॉर्ड
बेस्ट क्लब बुलेटिन (मंथली)
असे एकूण १५ पुरस्कार प्रदान करण्यात आले.
या यशाबद्दल बोलताना सौ. अरुंधती महाडिक म्हणाल्या की, “सर्व पदाधिकारी, सदस्य आणि सहकाऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळेच हे शक्य झाले. समाजासाठी समर्पित वृत्तीने केलेल्या कामाचे हे फळ आहे.”
या पत्रकार परिषदेला रोटरी क्लबचे बी. एस. शिंपुकडे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
वर्षभरातील समाजोपयोगी उपक्रमांची दखल : रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनला तब्बल १५ पुरस्कार
|