बातम्या
ग्रामपंचायतींमध्ये जेष्ठांसाठी विरंगुळा केंद्रे सुरू होणार
By nisha patil - 4/9/2025 3:55:35 PM
Share This News:
ग्रामपंचायतींमध्ये जेष्ठांसाठी विरंगुळा केंद्रे सुरू होणार
जागतिक जेष्ठ नागरिक दिनापूर्वी केंद्रे कार्यान्वित करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
कोल्हापूर, दि. 4 : जिल्ह्यातील पाच हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये जेष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्रे स्थापन करण्यास प्राधान्य द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले. येणाऱ्या जागतिक जेष्ठ नागरिक दिनापूर्वी (1 ऑक्टोबर) ही केंद्रे सुरू करण्याचे नियोजन करण्याचे आदेश त्यांनी जेष्ठ नागरिक समन्वय व संनियंत्रण समितीच्या बैठकीत दिले.
जिल्हाधिकारी म्हणाले की, ही केंद्रे जेष्ठांचे सामाजिक, मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी उपयुक्त ठरतील. एकटेपणा व नैराश्य टाळण्यासाठीही हे महत्त्वाचे व्यासपीठ ठरेल. सध्या जिल्ह्यातील 20 नगरपालिकांमध्ये विरंगुळा केंद्रे कार्यरत असून, त्यातील सुविधा अधिक दर्जेदार करण्यावर भर देण्यात येणार आहे.
बैठकीत आरोग्य शिबिरे, शासन योजनांचा लाभ, जेष्ठांसाठी बँक व शासकीय कार्यालयांत स्वतंत्र सुविधा यावर चर्चा झाली. वयोश्री योजनेअंतर्गत प्रलंबित अर्ज तातडीने मार्गी लावण्याचे, तसेच बँकांमध्ये पिण्याचे पाणी व बसण्याची सोय उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले.
जेष्ठांना शासकीय योजना समजावून सांगण्यासाठी लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या सहभागातून विशेष उपक्रम राबवले जाणार आहेत. सेवा पंधरवड्यात जेष्ठांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्याचेही ठरले.
छत्रपती शाहूजी सभागृहात झालेल्या या बैठकीला अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. बी. धीरज कुमार, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन साळे, जिल्हा नगरप्रशासन अधिकारी नागेंद्र मुतेकर यांच्यासह जिल्हा परिषदेचे व आरोग्य विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
ग्रामपंचायतींमध्ये जेष्ठांसाठी विरंगुळा केंद्रे सुरू होणार
|