खेळ

भारतात खेळण्यास नकार ठरला महागात; टी-२० विश्वचषकातून बांगलादेश बाहेर

Refusing to play in India proved costly Bangladesh out of T20 World Cup


By nisha patil - 1/25/2026 2:05:14 PM
Share This News:



भारतामध्ये होणाऱ्या आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेतून बांगलादेशला वगळण्याचा धक्कादायक निर्णय आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) घेतला आहे. बांगलादेशच्या जागी आता स्कॉटलंडचा संघ स्पर्धेत सहभागी होणार आहे.

सुरक्षेच्या कारणावरून बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) आपला संघ भारतात पाठवण्यास नकार दिला होता. विशेषतः वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानला आयपीएलमधून परत बोलावण्याचा निर्णय आणि भारत दौऱ्यावर ठाम नकार ही भूमिका बीसीबीसाठी अडचणीची ठरली.

१४-२ मतांनी आयसीसीचा ठराव

दुबईत झालेल्या आयसीसी बोर्डाच्या बैठकीत १४-२ अशा बहुमताने बांगलादेशने भारतातच सामने खेळावेत, असा ठराव मंजूर करण्यात आला होता. बीसीबीला आपली भूमिका बदलण्यासाठी २४ तासांची मुदत देण्यात आली होती.

मात्र, बीसीबीकडून त्या वेळेत कोणतेही अधिकृत उत्तर देण्यात आले नाही. उलट, आयसीसीला कळवण्याआधीच ढाका येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. हे प्रोटोकॉलचे उल्लंघन असल्याचे आयसीसीने स्पष्ट केले.

शुक्रवारी सायंकाळी आयसीसीने ईमेलद्वारे बीसीबीला अधिकृतपणे कळवले की, बांगलादेशऐवजी स्कॉटलंड स्पर्धेत खेळणार आहे.

गट बदलण्याची मागणी फेटाळली

बांगलादेशने आपले सामने श्रीलंकेत हलवावेत किंवा गट बदलावा, अशी मागणी केली होती. मात्र, आयसीसीने ही मागणी थेट नाकारली.

या मागणीला फक्त पाकिस्तानने पाठिंबा दिला. पीसीबी अध्यक्ष मोहसिन नकवी यांनी बांगलादेशवर अन्याय झाल्याचे मत व्यक्त केले असून, पाकिस्तान संघाच्या भूमिकेबाबत अंतिम निर्णय सरकार घेईल, असेही त्यांनी सांगितले.

आर्थिक फटका बसणार

या निर्णयामुळे बीसीबीला मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे.

५ लाख अमेरिकी डॉलर्सची सहभाग फी गमावणार

आयसीसीकडून मिळणारा वार्षिक महसूल (सुमारे २७ दशलक्ष डॉलर्स) धोक्यात

प्रायोजकांकडील उत्पन्नातही मोठी घट होण्याची शक्यता

सुरक्षा मूल्यांकनानुसार बांगलादेशसाठी धोका कमी ते मध्यम स्वरूपाचा असल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र, क्रीडा सल्लागार आसिफ नजरुल यांनी अंतरिम सरकारचे प्रतिनिधी म्हणून भारत दौऱ्याला ठाम विरोध केला.

कायदेशीर लढाईचा पर्याय

बीसीबीने आयसीसीच्या विवाद निवारण समितीकडे धाव घेतली होती, मात्र ती याचिका फेटाळण्यात आली. आता बीसीबीसमोर स्वित्झर्लंडमधील लवाद न्यायालयात जाण्याचा एकमेव पर्याय उरला आहे. तरीही, स्पर्धा नियोजित वेळेतच सुरू होणार असल्याचे आयसीसीने स्पष्ट केले आहे.


भारतात खेळण्यास नकार ठरला महागात; टी-२० विश्वचषकातून बांगलादेश बाहेर
Total Views: 21