विशेष बातम्या
अवयवदानाची इच्छा नोंदवणे ही समाजाची जबाबदारी – पालकमंत्री प्रकाश आबिटकर
By nisha patil - 8/15/2025 3:16:57 PM
Share This News:
अवयवदानाची इच्छा नोंदवणे ही समाजाची जबाबदारी – पालकमंत्री प्रकाश आबिटकर
कोल्हापूर, दि. 15 (जिमाका) : "जास्तीत जास्त नागरिकांनी अवयवदानाचे फॉर्म भरून हयातीतच अवयवदानाची इच्छा नोंदवणे ही एक जबाबदारी बनायला हवी," असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.
स्वातंत्र्यदिनानिमित्त जिल्ह्यातील 117 पैकी 52 उपस्थित अवयवदाते व त्यांच्या नातेवाइकांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात त्यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी त्यांनी अवयवदानाचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवून महाराष्ट्राला या क्षेत्रात आघाडीवर नेण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमास खासदार शाहू महाराज छत्रपती, जैन आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी, जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., जिल्हा पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.
पालकमंत्री आबिटकर यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील नऊ हजारांहून अधिक रुग्ण किडनी प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांनी स्वतः 3 ऑगस्ट रोजी प्रथम अवयवदानाचा फॉर्म भरून राज्यातील मोहिमेला सुरुवात केल्याचे नमूद केले. अवयवदान पंधरवडा मोहीम सार्वजनिक आरोग्य व वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत राज्यभर राबवली जात असून, सोशल मीडिया, शाळा, बाजारपेठा आदी ठिकाणी जनजागृती केली जात आहे.
त्यांनी अवयवदात्यांच्या कुटुंबीयांचे धाडस, सामाजिक बांधिलकी आणि प्रेरणादायी योगदानाबद्दल कौतुक व्यक्त करत, इतरांनाही यासाठी प्रोत्साहित करण्याचे आवाहन केले.
अवयवदानाची इच्छा नोंदवणे ही समाजाची जबाबदारी – पालकमंत्री प्रकाश आबिटकर
|