बातम्या
रस्त्यांची दुरुस्ती आठ दिवसांत करा – आमदार क्षीरसागर यांचा इशारा
By nisha patil - 9/27/2025 4:24:23 PM
Share This News:
रस्त्यांची दुरुस्ती आठ दिवसांत करा – आमदार क्षीरसागर यांचा इशारा
अन्यथा हक्कभंग दाखल करू; महापालिका अधिकाऱ्यांना सज्जड ताकीद
शहरातील खड्डेमय रस्त्यांबाबत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आणि आमदार राजेश क्षीरसागर यांनी महापालिका अधिकाऱ्यांना सज्जड इशारा दिला आहे. “आठ दिवसांत रस्त्यांची सुधारणा झाली पाहिजे, अन्यथा लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा अवमान करणाऱ्या अधिकाऱ्यांवर हक्कभंग प्रस्ताव दाखल करू,” असा इशारा त्यांनी दिला.
शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीत क्षीरसागर यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. “रस्त्यांसाठी निधी मंजूर असूनही दर्जेदार काम होत नाही. महानगरपालिका सल्लागार कंपनी, वॉर्ड अधिकारी आणि अभियंते यांनी तात्काळ पाहणी करून जबाबदारी पार पाडावी. कंत्राटदार कामात दिरंगाई करत असतील तर त्यांना ब्लॅकलिस्ट करून नवीन निविदा काढा,” असे ते म्हणाले.
इतर मुद्द्यांवरही कारवाईची सूचना
पाणीटंचाई, गांधी मैदानात पाणी साचण्याची समस्या तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनकपातीबाबतही आमदार क्षीरसागर यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. कामगारांचे हक्काचे पैसे तात्काळ मिळावेत यासाठी ठेकेदारांवर कठोर कारवाई करा, अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी आदेश दिले.
बैठकीस अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, शहर अभियंता रमेश मस्कर, जिल्हा वाहतूक समिती सदस्य रेवणकर यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
रस्त्यांची दुरुस्ती आठ दिवसांत करा – आमदार क्षीरसागर यांचा इशारा
|