बातम्या

महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये पीडितेला न्याय देण्यास सहाय्यकारी वार्तांकन असावे

Reporting should be supportive of providing justice to the victim in cases of violence against women


By nisha patil - 4/21/2026 12:51:47 PM
Share This News:



महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये पीडितेला न्याय देण्यास सहाय्यकारी वार्तांकन असावे - लेखिका डॉ. रिचा सूद

महिला अत्याचार घटनांच्याबाबत वार्तांकन करताना संवेदनशीलता व जबाबदारी अत्यंत महत्त्वाची असते. संपूर्ण वार्तांकनामध्ये पिडीतेच्या नावाच्या गुप्ततेबाबत खबरदारी बाळगावी लागते. अशा घटनांच्या वार्तांकनामध्ये पीडितेला न्याय देण्यास सहाय्य ठरणारे वार्तांकन असावे, अशी अपेक्षा लेखिका डॉ रिचा सूद यांनी व्यक्त केली.

 

राष्ट्रीय महिला आयोग आणि महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित ‘महिला, माध्यमे आणि तंत्रज्ञान’ या एकदिवसीय कार्यशाळेत माध्यमांद्वारे केले जाणारे लिंग संवेदनशील वार्तांकन याविषयी लेखिका डॉ.सूद यांनी आपली भूमिका मांडली. यावेळी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, माहिती व जनसंपर्क महासंचालक तथा प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे, वरिष्ठ पत्रकार स्वाती गुप्ता उपस्थित होते.

 

माध्यमांच्या प्रभावाबाबत बोलताना डॉ.सूद म्हणाल्या, पत्रकार केवळ बातमी देत नाही, तर समाजाच्या विचारप्रक्रियेलाही दिशा देत असतात. त्यामुळे वृत्तांकन करताना संवेदनशीलता अत्यावश्यक आहे. गुन्ह्याची तीव्रता अधोरेखित करणे, पीडितेचे वैयक्तिक आयुष्य उघड न करणे, पीडितेच्या सन्मानाचे रक्षण करणे, तिच्यावर दोषारोप टाळणे वार्तांकनात अपेक्षित आहे. त्याचबरोबर ' व्हिक्टिम' ऐवजी ‘सर्व्हायव्हर’ हा शब्द वापरावा. उत्तेजक मथळे, कपड्यांवर किंवा वैयक्तिक बाबींवर भाष्य टाळावे. गुन्हेगाराच्या जबाबदारीवर भर देत त्याला सामाजिकदृष्ट्या उत्तरदायी ठेवावे.

 

डॉ. सूद म्हणाल्या, माध्यमांनी सकारात्मक बातम्यांना प्राधान्य देण्याची गरज आहे. पहिल्या पानावर प्रेरणादायी आणि यशस्वी कथा आल्यास युवकांना योग्य दिशा मिळेल. सध्याच्या काही वृत्तांकन पद्धतींमध्ये गुन्ह्याचे अतिप्रदर्शन आणि शिक्षेवर कमी भर दिला जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. महिलांसाठी उपलब्ध असलेल्या शासकीय योजना, मदत केंद्रे, कायदेशीर सल्ला व प्रशिक्षण कार्यक्रमांची माहिती ठळकपणे प्रसिद्ध करावी. तसेच माध्यमांनी वेदनेतून प्रेरणेकडे नेणारा पूल बनले पाहिजे, असेही त्या म्हणाल्या. इतिहासातील गौरवशाली महिलांच्या कार्याचा उल्लेख करत अशा प्रेरणादायी कथा अधिक प्रमाणात प्रसिद्ध करण्याचे आवाहन डॉ.सूद यांनी केले.


महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये पीडितेला न्याय देण्यास सहाय्यकारी वार्तांकन असावे
Total Views: 3