विशेष बातम्या
शिरढोण ग्रामसभेत थकबाकी सवलतीचा ठराव मंजूर
By nisha patil - 12/12/2025 4:52:02 PM
Share This News:
शिरढोण ग्रामसभेत थकबाकी सवलतीचा ठराव मंजूर
बोगस बिलाची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी
शिरढोण प्रतिनिधी/ता.१२शिरढोण(ता.शिरोळ) येथील विशेष ग्रामसभेमध्ये ग्रामपंचायतीच्या थकीत निवासी मालमत्ता धारकांचे घरपट्टी, दिवाबत्ती,पाणीपट्टी इत्यादी कराच्या थकबाकीच्या ५०% सवलत देण्याचा निर्णय सरपंच सागर भंडारे यांच्या अध्यक्षस्थानी झालेल्या ग्रामसभेमध्ये घेण्यात आला.तसेच गेल्या पाच वर्षात ग्रामपंचायत मध्ये झालेल्या बोगस कामाची चौकशी होऊन दोषीवर कडक कारवाई करण्याचा ठराव मंजूर करण्यात आली.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत ग्रामपंचायतीकडे निवासी कर , पाणीपट्टी,दिवाबत्ती कर यामध्ये थकीत खातेदारांना ५० टक्के सवलत देण्या विषयी आज ग्रामपंचायतीने विशेष ग्रामसभा आयोजित केली होती.यामध्ये थकबाकीदार मालमत्ताधारकांना ५०% कर सवलत देण्याचा निर्णय बहुमताने मंजूर करण्यात आला.तसेच गेल्या ५ वर्षात ग्रामपंचायतीने २कोटी,७२लाख रुपयाची केलेल्या कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचा ठराव मंजूर केला.
ग्रामपंचायतीची कामे सदस्यच घेतात तसेच ठेकेदार निश्चित झालेला असतो फक्त टेंडर नोटीस द्यायचे म्हणून दिली जाते ती देखील बंद पडलेल्या दैनिकात दिली जाते. जेणेकरून लोकांना त्याची माहिती होऊ नये, बोगस कारभार करता यावा अशीही कामकाजाची पद्धत आहे.या कामाला चाप लागावा यासाठी विकास कामाचा डिजिटल बोर्ड लावणे, जे सदस्य काम घेतात त्यांना टेंडर न देणे, चुकीचे काम करणाऱ्यांना जोड्याने हाणले पाहिजे,भ्रष्ट कारभारची चौकशी झाली पाहिजे. असा ठराव केला
आज झालेल्या ग्रामसभेत आर.ओ.फिल्टर, डस्टबिन, सॅनिटरी नॅपकिन, समाज मंदिर दुरुस्ती, नळ पाणीपुरवठा दुरुस्ती, संगणक प्रयोगशाळा, स्टेशनरी खर्च, प्रशिक्षण, आरोग्य शिबिर, संगणक दुरुस्ती, सीसीटीव्ही कॅमेरा या ग्रामपंचायतीचा बोगस बिलाचा कारभार चव्हाट्यावर आला असून ग्रामपंचायतीच्या कारभाराची खातेनिहाय चौकशी करून दोषीवर कारवाई करण्याची मागणी ग्रामसभेत बहुमताने मंजूर करण्यात आले.या वेळी झालेल्या चर्चेत सुरेश सासणे, माजी उपसरपंच पोपट पुजारी, अविनाश पाटील, विजय सूर्यवंशी, विश्वास बालिघाटे, शाहीर बानदार, मनोज गुरुवाण,अभय भोसले अरिहंत कापसे, वैभव देसाई, सुधाकर खोत,अशोक मगदूम,यानी सहभाग घेतला. ग्रा.पं. सदस्य भास्कर कुंभार, रवी कांबळे, शक्ती पाटील, आरिफ मुजावर, बाबासो हेरवाडे, तेजस्विनी पाटील, शर्मिला टाकवडे, रेश्मा चौधरी, पोलिस पाटील अनुराधा जाधव यांच्या सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गेल्या पाच वर्षात ग्रामपंचायती कडून झालेल्या कामाचे लेखापरीक्षण करून खातेनिहाय चौकशी करण्यात यावी अलीबाबा चाळीस चोरांची टोळी ग्रामपंचायत वर दरोडा घालत आहेत यांची चौकशी होऊन कारवाई करण्याची मागणी गट विकास आधिकारी यांच्याकडे करणार आहे. चौकशी झाली नाही तर आम्हाला उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागेल.अशी माहिती पत्रकार परिषदेत सुरेश सासणे, माजी उपसरपंच अविनाश पाटील, पोपट पुजारी, जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य प्रा. चंद्रकांत मोरे, विश्वास बालीघाटे यांनी दिली
शिरढोण ग्रामसभेत थकबाकी सवलतीचा ठराव मंजूर
|