बातम्या

आजरा शहरातील पारंपारिक पशु खरेदी विक्री बाजार पुन्हा सुरु करा

Restart the traditional livestock trading market in Ajara town


By nisha patil - 10/13/2026 7:37:53 PM
Share This News:



आजरा शहरातील पारंपारिक पशु खरेदी विक्री बाजार पुन्हा सुरु करा

*आजरा शहर एकसंघ व्यापारी मंडळाची नगरपंचायतीकडे मागणी

*आजरा(हसन तकीलदार):-आजरा शहर हे कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागातील तसेच आजरा तालुका व पंचक्रोशीतील एक महत्वाचे व्यापारी आणि दळणवळणाचे केंद्र असून आजरा शहरामध्ये मागील 8 ते 9 दशकांचा इतिहास लाभलेला पशु खरेदी विक्रीचा बाजार भरत होता. कोरोना काळापासून या बाजारपेठेच्या पाऊलखुणा पुसल्या गेल्या आहेत. कोरोना काळ संपून अनेक वर्षे लोटली तरी आजही या जनवरांच्या बाजाराकडे कोणीही गांभीर्याने पाहिलेलं नाही की सुरु करण्याचा प्रयत्न केला गेलेला नाही त्यामुळे पुन्हा एकदा जनावरांच्या बाजारात पशु खरेदी विक्री व्यवसाय  सुरु करावा अशी मागणी आजरा शहर एकसंघ व्यापारी मंडळाने आजरा नगर पंचायत नगराध्यक्ष यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.
     

पशु बाजारपेठेमुळे आजरा तालुक्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील विविध भागातील तसेच कोकणातील सावंतवाडी, कुडाळपर्यंत आणि कर्नाटकातील संकेश्वर,निपाणी, बेळगाव पर्यंतच्या शेतकरी व पशुपालकांना मोठी बाजारपेठ उपलब्ध होत होती. साधारणपणे 80  ते 90 वर्षांचा इतिहास आणि परंपरा असलेला आजऱ्यातील पशु बाजार कोरोना महामारीच्या काळात बंद करण्यात आला. कोरोना काळ संपून अनेक वर्षे उलटून गेली असतानाही हा बाजार अद्याप पूर्ववत सुरु झालेला नाही त्यामुळे या संपूर्ण परिसरातील शेतकरी, पशुपालक, पशु व्यापारी तसेच बाजाराशी संबंधित छोटेमोठे व्यवसायिक यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

आजरा शहरातील पशु बाजार हा केवळ पशु खरेदी विक्रीचा बाजार नसून तो या परिसरातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा एक महत्वाचा आधारकेंद्र आहे. हा पशुबाजार सुरु झाल्यास आजरा शहरासह आजरा तालुका आणि आजूबाजूच्या विस्तृत परिसरातील शेतकरी व पशुपालकांना आपल्या जनावरांची खरेदी विक्री करण्यासाठी सोयीचे व विश्वासार्ह ठिकाण उपलब्ध होण्याबरोबरच तालुक्यातील व परिसरातील शेतकरी व पशुपालकांना मोठी सोय उपलब्ध होणार आहे. पशु बाजाराच्या निमित्ताने शेतकरी, व्यापारी व ग्राहकांमुळे शहरातील किराणा, हॉटेल, वाहतूक, पशुखाद्य, कृषी साहित्य व इतर व्यवसायांना चालना मिळणार आहे. त्यामुळे आजरा शहराच्या व्यापारात अधिक उलाढाल होण्यास मदत होणार आहे. दूर बाजारपेठेत जाण्याचा वेळ व खर्च कमी होईल त्यामुळे याचा सकारात्मक विचार व्हावा अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.
   

निवेदनावर महेश नार्वेकर (अध्यक्ष),वाय. जी. इंजल (उपाध्यक्ष), सचिन इंदलकर(सचिव), संजय हरेर, मनोज गुंजाटी, मल्लिकार्जुन हुक्केरी, रवींद्र केळकर, दयानंद भोपळे, बाळासाहेब पाचवडेकर, श्रीपाद कुलकर्णी, दाऊद लमतूरे आदींच्या सह्या आहेत.


आजरा शहरातील पारंपारिक पशु खरेदी विक्री बाजार पुन्हा सुरु करा
Total Views: 154