बातम्या
आजऱ्यात परतीच्या पावसाची हजेरी
By nisha patil - 10/18/2026 12:27:45 PM
Share This News:
आजऱ्यात परतीच्या पावसाची हजेरी
*आजरा(हसन तकीलदार):- कालपासून ढग दाटून येत होते पण बरसत नव्हते. उष्म्यात कमालीची वाढ झाली होती. आज दि. 17 ऑक्टोबर रोजी सकाळपासूनच मेघांनी गर्दी केली होती. उष्मा वाढला होता. ढगाळ वातावरण होते परंतु मेघ काही पाझरत नव्हते. मागील दीड दोन महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने पिके करपून गेली. ज्या ठिकाणी पाण्याचे साधन होते त्या शेतकऱ्यांनी पिकांना पाणी देऊन पिकांना जीवदान देण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्याने आकाशाकडे नजर लावली होती. मार्च एप्रिल सारखी नद्या नाल्यांची अवस्था झाली आहे. पाण्याचा काटेकोर आणि जुजबी वापर करून पाण्याची बचत करणे काळाची गरज बनली आहे.
आज दुपारी पावणेचारच्या सुमारास मेघगर्जनेसह वरूण राजाने कृपादृष्टी केली. पाऊस पडूनही हवेत उष्मा होता. परतीच्या पावसाने नद्या नाले भरले तरच पुढे पाण्याची टंचाई कमी होणार आहे. त्यामुळे परतीच्या पावसाची नितांत गरज आहे. नद्या नाले भरायला पाहिजे.पाणी व्यवस्थापन, पाण्याचा जमिनीत निचरा करून जमिनीतील पाण्याची पातळी वाढवणे, पाणी आडवा पाणी जिरवा, वनराई बंधारे बांधून पाणी अडवणे यासारखे उपक्रम राबवणे गरजेचे आहे.
यावर्षी सरासरीपेक्षा पाऊस कमी पडल्याने एप्रिल मे मध्ये पाण्याची तिव्र टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजरेकरांनी पाण्याचा जपून वापर केला पाहिजे. गल्ल्या,कॉलनीत ज्यांनी ज्यांनी गरज नसताना पाण्याचे जादा नळ कनेक्शन घेतले आहेत आणि पाणी गटारीला आणि रस्त्यावर सोडत आहेत अशा कनेक्शन धारकांची नळ कनेक्शन बंद केली पाहिजेत. प्रत्येक वॉर्डातील प्रतिनिधिनी यामध्ये लक्ष घालून प्रशासनाला सहकार्य करण्याची गरज आहे. जनजागृती करून पाणी बचतीचा सल्ला देणेही गरजेचे आहे.
आजऱ्यात परतीच्या पावसाची हजेरी
|