बातम्या
पासपोर्ट अधिकारी डॉ. विनोद गायकवाड यांच्याकडून आढावा
By nisha patil - 1/16/2026 5:18:36 PM
Share This News:
कोल्हापूर :- डॉ. विनोद गायकवाड (भारतीय परराष्ट्र सेवा), प्रादेशिक पासपोर्ट अधिकारी, पुणे, यांनी आज पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र (PoPSK), कोल्हापूर येथे भेट देऊन केंद्राच्या कामकाजाचा आढावा घेतला आणि पासपोर्ट अर्जदारांना दिल्या जाणाऱ्या सेवांची तपासणी केली. या भेटीदरम्यान त्यांनी अपॉइटमेंट व्यवस्थापन, कागदपत्रांची तपासणी, अर्जदारांना दिली जाणारी मदत तसेच केंद्रातील एकूण सोयीसुविधांचा आढावा घेतला. त्यांनी कर्मचाऱ्यांशी संवाद साधून कोल्हापूर व परिसरातील नागरिकांना वेळेत, कार्यक्षम आणि पारदर्शक सेवा देण्यासाठी केलेल्या त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले.
डॉ. गायकवाड यांनी केंद्रात उपस्थित असलेल्या अर्जदारांशीही संवाद साधला व अर्ज प्रक्रियेबाबत तसेच उपलब्ध सुविधांबाबत त्यांचा अभिप्राय घेतला. सेवा देताना कार्यक्षमता, व्यावसायिकता आणि नागरिकाभिमुख दृष्टिकोन राखण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. कोल्हापूर PoPSK च्या कामगिरीबाबत माहिती देताना ते म्हणाले, सन 2025 मध्ये सुमारे 15 हजार 600 पासपोर्ट अर्ज प्राप्त झाले, त्यापैकी 14 हजार 804 पासपोर्ट जारी करण्यात आले. याशिवाय 635 पोलिस क्लिअरन्स सर्टिफिकेट (PCC) सुद्धा 2025 मध्ये कोल्हापूर PoPSK मधून जारी करण्यात आली. यावरून केंद्राची कार्यक्षमता आणि सेवांचा वाढता विस्तार दिसून येतो.
वाढती मागणी आणि वाढता अर्जदारांचा ओघ लक्षात घेऊन, कोल्हापूर PoPSK येथे तिसरा काउंटर सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा डॉ. गायकवाड यांनी केली. यामुळे अर्ज प्रक्रियेचा वेग वाढेल आणि अर्जदारांचा प्रतीक्षा कालावधी कमी होण्यास मदत होईल.
पासपोर्टविषयक कोणत्याही चौकशीसाठी अर्जदारांनी आपला अर्ज क्रमांक व तपशीलासह rpo.pune@mea.gov.in या ई-मेल वर संपर्क साधावा. तसेच तक्रार निवारणासाठी प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय, पुणे येथे दर महिन्याच्या पहिल्या बुधवारी ‘जनसंवाद सत्र’ आयोजित करण्यात येते. त्या दिवशी पासपोर्ट अर्जदार प्रत्यक्ष येऊन आपली तक्रार मांडू शकतात, असेही डॉ. गायकवाड यांनी स्पष्ट केले.
पासपोर्ट अधिकारी डॉ. विनोद गायकवाड यांच्याकडून आढावा
|