राजकीय
अमृत 1 व अमृत 2 पाणीपुरवठा व मलनिस्सारण कामांचा आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांच्याकडून आढावा
By nisha patil - 7/5/2026 12:15:05 PM
Share This News:
अमृत 1 व अमृत 2 पाणीपुरवठा व मलनिस्सारण कामांचा आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांच्याकडून आढावा
कामात दिरंगाई झाल्यास ठेकेदारांवर ब्लॅकलिस्ट कारवाईचा इशारा
महानगरपालिकेच्या वतीने शहरात सुरू असलेल्या अमृत 1 व अमृत 2 अंतर्गत पाणीपुरवठा योजना तसेच मलनिस्सारण योजनेच्या कामांचा आढावा आज आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी घेतला. ही बैठक दुपारी आयुक्त कार्यालयात पार पडली.
या बैठकीत आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी अमृत 1 योजनेअंतर्गत उर्वरित कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित ठेकेदारांना देण्यात आल्या. शहरातील 12 पाणीटाक्यांपैकी 9 टाक्यातून सध्या पाणीपुरवठा सुरू असून उर्वरित 3 टाक्यांचे टेस्टिंग सोमवारपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच क्रॉस कनेक्शन चेंबर, चेनलिंक फेन्सिंग, कळंबा फिल्टर हाऊस येथील संप दुरुस्ती, पाइपलाइन खुदाईनंतरचे रोड रिस्टोरेशन आदी अपूर्ण कामे तातडीने सुरू करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. ठेकेदारांनी मायक्रो प्लॅनिंग करून संभाव्य काम पूर्णत्वाच्या तारखांसह नियोजन सादर करावे, अन्यथा ब्लॅकलिस्टची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. टाक्यांच्या कंपाउंड वॉलच्या कामाचा लाईनआऊट सोमवारपर्यंत देण्याच्या सूचना देण्यात आल्या. प्रत्येक कामासाठी स्वतंत्र पथके वाढवून मनुष्यबळ व यंत्रसामग्री वाढवावी, अशा सूचना दिल्या. अमृत 1 योजनेतील प्रलंबीत कामाबाबत प्रशासकांनी नाराजी व्यक्त करत सोमवारपासून सर्व कामे सुरू झाली पाहिजेत, असे स्पष्ट केले. याबाबत पुन्हा एका महिन्यानंतर आढावा घेतला जाणार आहे. जुन्या पाच टाक्यांपैकी चार टाक्यांची दुरुस्ती पूर्ण झाली असून एका टाकीचे काम अद्याप अपूर्ण आहे. ते तात्काळ पुर्ण करावे.
मलनिस्सारण योजनेअंतर्गत 78 कि.मी. ड्रेनेज लाईन पैकी 68 कि.मी. काम पूर्ण झाले आहे. ज्या ठिकाणी अडथळे नाहीत, तेथे तात्काळ कामे सुरू करण्याचे आदेश देण्यात आले. दोन्ही योजनांची मुदत 2020 अखेरपर्यंत होती, मात्र अद्याप कामे अपूर्ण असल्याने विलंबाची कारणे विचारण्यात आली. काही ठिकाणी कामाचे स्वरूप व डिझाईन बदलणे, विद्युत खांब स्थलांतर आणि खाजगी जागामालकांचा विरोध यामुळे विलंब झाल्याचे जल अभियंता हर्षजीत घाटगे यांनी सांगितले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, जल अभियंता हर्षजीत घाटगे, कनिष्ठ अभियंता संजय नागरगोजे, सुरेश पाटील, प्रज्ञा गायकवाड, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपअभियंता मुरलीधर भोसले, सहाय्यक अभियंता योगेश उलपे, दास ऑफ शोर लिमिटेड मुंबई चे प्रतिनिधी इनामदार, कुलकर्णी, नोबल कन्स्ट्रक्शन कंपनीचे प्रतिनिधी मदने व शेट्टी उपस्थित होते.
अमृत 1 व अमृत 2 पाणीपुरवठा व मलनिस्सारण कामांचा आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांच्याकडून आढावा
|