बातम्या
कोल्हापूर दसरा महोत्सव ट्रस्ट बैठकीचा आढावा
By nisha patil - 10/9/2025 2:37:57 PM
Share This News:
कोल्हापूर दसरा महोत्सव ट्रस्ट बैठकीचा आढावा
पर्यटन वृद्धीसाठी ठराव, निधी उभारणीसाठी उपसमितीची स्थापना
कोल्हापूर, दि. 10 : सन 2006 पासून कोल्हापूर दसरा महोत्सव ट्रस्टच्या माध्यमातून दसरा महोत्सवाचे आयोजन केले जात असून, यंदा पर्यटकवृद्धीवर भर देण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. जिल्हाधिकारी तथा ट्रस्टचे अध्यक्ष अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली शाहूजी सभागृहात झालेल्या बैठकीत पर्यटक वाढीसाठी विविध विश्वस्तांमार्फत समन्वयाने कामकाज करण्याचा ठराव मंजूर झाला.
बैठकीत जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग, पर्यटन विकास महामंडळ, शिवाजी विद्यापीठ, महावितरण, सार्वजनिक बांधकाम, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स, हॉटेल मालक संघ, प्रमोटर्स-बिल्डर्स असोसिएशन, सराफ असोसिएशन आदी संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले.
जिल्हाधिकारी येडगे यांनी सांगितले की, ट्रस्टचे काम केवळ महोत्सवापुरते मर्यादित न राहता वर्षभर पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी उपक्रम राबवणे गरजेचे आहे. यासाठी निधी उभारणीसाठी स्वतंत्र उपसमिती नेमण्यास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.
बैठकीत मागील वर्षाचे लेखापरीक्षण मान्य करण्यात आले असून, ते धर्मादाय आयुक्तांकडे सादर करण्यासाठी तीन विश्वस्तांना अधिकार देण्यात आले. यंदाच्या नवरात्रोत्सव (20 सप्टेंबर – 2 ऑक्टोबर) आणि दसरा महोत्सवासाठी 20 लाख रुपयांचा निधी ट्रस्टमार्फत खर्च करण्याचा निर्णय घेण्यात आला. आवश्यकतेनुसार पुढील बैठकीत अतिरिक्त निधीबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
कोल्हापूर दसरा महोत्सव ट्रस्ट बैठकीचा आढावा
|