बातम्या

पदवीधर मतदार संघासाठी मतदार याद्यांचे पुनरिक्षण जाहीर

Revision of voter lists for graduate constituencies announced


By nisha patil - 1/10/2025 6:03:02 PM
Share This News:



पदवीधर मतदार संघासाठी मतदार याद्यांचे पुनरिक्षण जाहीर

 दि. १ नोव्हेंबर २०२५ हा अर्हता दिनांक धरून पदवीधर मतदार संघासाठी मतदार याद्यांचा पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार व महाराष्ट्र मतदार नोंदणी अधिनियम १९६० मधील तरतुदीनुसार हा कार्यक्रम टप्प्याटप्प्याने पार पडणार आहे.

या कार्यक्रमानुसार प्रथम टप्प्यात दि. ३० सप्टेंबर २०२५ रोजी कलम ३१ (३) अन्वये जाहीर सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानंतर दि. १५ ऑक्टोबर २०२५ रोजी वर्तमानपत्रांमध्ये नोटीसीची प्रथम पुनप्रसिद्धी करण्यात येईल. दि. २५ ऑक्टोबर २०२५ रोजी नोटीसीची द्वितीय पुनप्रसिद्धी करण्यात येणार आहे.

अर्जदारांना नमुना १८ किंवा १९ द्वारे अर्ज सादर करण्यासाठी दि. ६ नोव्हेंबर २०२५ ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. त्यानंतर दि. २० नोव्हेंबर रोजी हस्तलिखिते तयार करून प्रारुप मतदार याद्यांची छपाई केली जाईल. प्रारुप मतदार यादी दि. २५ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध होणार आहे.

प्रारुप यादी जाहीर झाल्यानंतर दि. २५ नोव्हेंबर ते १० डिसेंबर २०२५ या कालावधीत दावे व हरकती स्वीकारल्या जाणार आहेत. यानंतर प्राप्त झालेल्या दावे व हरकतींचा निपटारा करून पुरवणी यादी तयार केली जाईल व छपाई करण्यात येईल. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

निवडणूक विभागाने पदवीधर मतदारांना आवाहन केले आहे की, ज्यांचे नाव मतदार यादीत समाविष्ट करावयाचे आहे त्यांनी नियोजित वेळेत अर्ज दाखल करावेत तसेच आपल्या माहितीची पडताळणी करून आवश्यक दावे-हरकती दाखल कराव्यात.


पदवीधर मतदार संघासाठी मतदार याद्यांचे पुनरिक्षण जाहीर
Total Views: 104